मुलींना शिकू द्या, मी ट्रॅक्टर पाठवतो, शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावला सोनू सूद
सोनू सूदचं सर्वच स्तरातून कौतुक
मुंबई : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना लॉकडाऊनमध्ये अनेक जण आपल्या घरातच आहेत. पण बॉलिवूड अभिनेता सोनू सूद मात्र समाजसेवेत व्यस्त आहे. अजूनही तो वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. बॉलीवुडचा हा विलेन खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहे. सोनू सूदने आतापर्यंत हजारो लोकांना मदत केली आहे. आता सोनू सूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
सोशल मीडियावर एका गरीब शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनू सूदने लगेचच मदतीचं आश्वासन दिलं. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा आंधप्रदेश असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये एक शेतकरी बैल नसल्याने आपल्या 2 मुलींच्या माध्यमातून नांगरणी करत आहे. बैलांसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याचा मुलीच स्वत:च नांगरणी करु लागल्या. सोनू सूदने लगेचच या शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला.
सोनू सूदने ट्विट करत म्हटलं की, 'या शेतात आता 2 बैल नांगरणी करतील. उद्या सकाळीपर्यंत 2 बैल या शेतात नांगरणी करतील. शेतकरी आपल्या देशाचा गौरव आहे. या मुलींना शिक्षण पूर्ण करु द्या.' पण नंतर सोनू सूदने पुन्हा ट्विट करत बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर पाठवण्याचा निर्णय घेतला. सोनू सूदचं इतकं मोठं मन पाहून अनेकांनी त्याच्या या कामाचं कौतुक केलं आहे.
सोनू सूदने लॉकडाऊनला विविध राज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली. त्यानंतर आता तो मजुरांना काम मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच आणखी एक गोष्ट समोर आली. सोनू सूदचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोनू सूद परदेशात अडकलेल्या लोकांना देखील देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.