loksabha election 2019 : प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्याचं राजकारणात पदार्पण
राजकीय पटलावरही चालणार का त्यांची जादू
हैदराबाद : अभिनयाकडून राजकीय विश्वात पदार्पण करणाऱ्या कलाकारांमध्ये आता आणखी एका प्रसिद्ध चेहऱ्याची भर पडली आहे. तो चेहऱा आहे विनोदी अभिनेता अली याचा. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तेलुगू चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकार म्हणून नावारुपास आलेल्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेता अली यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत अली यांनी सोमवारी पक्षप्रवेश केला. येत्या लोकलभा निव़डणूकांच्या रिगणात ते उतरणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.
खुद्द अली यांनीच राजकारणात असणाऱ्या त्यांच्या स्वारस्याविषयी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याविषयी जगनमोहन रेड्डी यांना सांगितलं होतं. ज्यानंतर त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुळच्या आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथील असणाऱ्या अली यांनी राजकारणात प्रवेश केला. वायएसआर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहिती देण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रसिद्ध मंडळी आणि कलाकारांनी वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आहे. तेलुगू देसम पार्टीशी झालेल्या मतभेदानंतर ज्येष्ठ अभिनेत्री जयासुधा आणि त्यांचा मुलगा निहारनेही वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रविवारी २०१९ मधील लोकसभा निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्यानंतर जागावाटप, पक्षांतर्गत वाद, नवे पक्षप्रवेश आणि प्रसिद्ध मंडळींच्या लोकप्रियतेचा पक्षासाठी केला जाणार वापर या साऱ्या गोष्टींविषयीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे लोकशाहीचा हा जागर आता टप्प्याटप्प्यावर आणखी रंगतदार होणार हे नाकारता येणार नाही. सात टप्प्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार असून, सात टप्प्यांमध्ये निवडणुकांसाठीचं मतदान घेण्यात येणार आहे. ११ एप्रिलपासून सुरू असणारीही निवडणूक प्रक्रिया १९ मे पर्यंत चालणार आहे. ज्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार असून उमेदवारांच्या हाती मतदारांनी दिलेल्या निकाल येणार आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील निवडणुका एकाच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी पार पडणार आहेत.