नवी दिल्ली  : भाजपविरोधी महाआघाडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बीएसपी प्रमुख मायावती या काँग्रेससोबत जाण्यासाठी इच्छूक होते पण जागावाटपावर सहमती न झाल्याने काँग्रेससोबत आघाडी अशक्य दिसत आहे. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बीएसपीमध्ये जागावाटपावरुन एकमत झाल्याचं कळतं आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून दोघेही एकत्र निवडणूक लढवू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात एकूण 80 जागांपैकी, 38 जागेवर समाजवादी तर 37 जागांवर बीएसपी निवडणूक लढवणार आहे. अखिलेश यादव आणि मायवती आरएलडीसाठी 3 तर काँग्रेसच्या 2 जागा लढवू इच्छित नाही. अशा स्थितीत काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये एकट्याला निवडणूक लढवावी लागणार आहे. अमेठी आणि रायबरेलीमध्ये दोघेही आपला उमेदवार देणार नाहीत. एसपी काही जागा काही छोट्या पक्षांना देणार आहे.


अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात जागावाटपाबाबत एकमत झालं आहे. याची औपचारीक घोषणा मायावती यांच्या वाढदिवशी होणार आहे. 15 जानेवारीला मायावती आपला वाढदिवस साजरा करतात. दरवर्षी मायावती एक पुस्तक जारी करतात ज्यामध्ये त्यांनी केलेली कामं आणि पुढचा दृष्टीकोन याबाबत त्या माहिती देतात.


लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून यंदा मायावतींच्या वाढदिवशी मोठं आयोजन होऊ शकतं. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना सोडून इतर पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाऊ शकतं. याच दिवशी सपा आणि बसपा युतीची घोषणा होऊ शकते.


मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बीएसपीने काँग्रेससोबत आघाडीचा प्रयत्न केला होता. पण जागावाटपावरुन आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रत्येकांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. समाजवादी पक्षाला 1 आणि बीएसपीला 3 जागा मिळाल्या. पण तरी देखील काँग्रेसला सत्तेसाठी जेव्हा जागा कमी पडत होत्या तेव्हा मायावती आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. पण काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात ते सहभागी झाले नाहीत.