समाजवादी पक्षाचा मोठा डाव; मोदींविरोधात बीएसएफच्या `त्या` जवानाला उमेदवारी
आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होईल.
वाराणसी: समाजवादी पक्षाने सोमवारी वाराणसीतून सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी जाहीर केली. भारतीय लष्करातील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवण्यात येत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट तेज बहादूर यादव यांनी केला होता. यानंतर झालेल्या चौकशीअंती २०१७ मध्ये तेजबहादूर यांना सैन्यातून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर तेज बहादूर यादव यांनी लष्करातील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज सपाकडून तेज बहादूर यादव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. तर काँग्रेसकडून या मतदारसंघात अजय राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी, अजय राय आणि तेज बहादूर असा तिरंगी मुकाबला होईल.
तेज बहादूर यांनी यापूर्वीच मला निवडणुकीतील विजय किंवा पराभवाची चिंता नसल्याचे म्हटले होते. मला केवळ सैन्यातील जवानांच्या समस्यांना वाचा फोडायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जवानांच्या नावाने मतांचा जोगवा मागतात. मात्र, त्यांच्यासाठी काहीच करत नाहीत, असा आरोपही तेज बहादूर यादव यांनी केला होता.
२०१७ साली तेज बहादूर यादव यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. या प्रकारानंतर तेज बहादूर यादव यांची चौकशी झाली आणि त्यांना लष्करातून बडतर्फ करण्यात आले होते.