नवी दिल्ली: जैव इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या विमानाने सोमवारी यशस्वी उड्डाण केले. डेहराडून इथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले. स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांनी या विमानाचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले. या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के जैव इंधन वापरण्यात आले होते. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो. 


१० ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे जैव इंधन धोरण जाहीर केले होते. त्यानंतर आपण याची यशस्वी अंमलबजावणी केली. विमान क्षेत्रातील आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी कामगिरी असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले. 


त्याचबरोबर सरकारने जैव इंधन आणि इथेनॉलवरील जीएसटीत कपात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेट्रोफा या वनस्पतींच्या बियांपासून हे इंधन तयार करण्यात आले. यापूर्वी फक्त अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला.