सीआयएसएफ अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावणाऱ्या स्पाईसजेटच्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्याला जयपूर विमानतळावर प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं. बाजूच्या गेटवर एकही महिला कॉन्स्टेबल उपस्थित नसल्यामुळे तिला रोखण्यात आलं अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. गुरुवारी हा प्रकार घडला असून, महिलेला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराधा राणी असं महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. ती ग्राउंड स्टाफचा भाग होती जे विमानांमध्ये अन्न आणि पेयं लोड करतात. तिच्याकडे गुरुवारी पहाटे 4 वाजता विमानतळावर प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं होती अशी माहिती आहे. पण तिने सुरक्षा तपासणी करुन घेण्यास नकार दिल्याने सुरक्षा अधिकाऱ्याशी वाद झाला अशी सूत्रांची माहिती आहे. साईड गेट हे कॅटरिंग वाहनांकडून वापरले जातात. 



वाद सुरु असताना सर्वजण आतील बाजूला गेले होते. यानंतर तिथे महिला कर्मचाऱ्याला बोलावण्यात आलं. याचदरम्यान शाब्दिक वाद सुरु असताना महिला कर्मचाऱ्याचा संयम सुटला आणि थेट सहाय्यक उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली अशी सूत्रांची माहिती आहे. 


सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे स्पाईसजेटनेही सीआयएसएफच्या जवानांनी 'लैंगिक भाषा' वापरल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. सीआयएसएफ जवानाने 'अयोग्य टिप्पणी केली आणि तिला 'त्याच्या घरी ड्युटीच्या वेळेनंतर येऊन भेटण्यास सांगितले' असा आरोप केला आहे.


"स्टील गेटवर कॅटरिंग वाहन घेऊन जात असताना, आमच्या महिला सुरक्षा कर्मचारी सदस्याकडे, ज्यांच्याकडे भारताच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा नियामक  (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) द्वारे जारी केलेला वैध विमानतळ प्रवेश पास होता, तिला अनुचित आणि अस्वीकार्य भाषा बोलली गेली. CISF च्या कर्मचाऱ्यांनी, तिला त्याच्या घरी ड्युटीच्या वेळेनंतर येऊन भेटायला सांगितलं,” असं स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.


हे लैंगिक छळाचं गंभीर प्रकरण असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहोत असं स्पाईसजेटने सांगितलं आहे. तसंच याप्रकरणी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती दिली आहे. "आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि तिला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत," असे एअरलाइनने म्हटले आहे.