Starbucks : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सध्या समलैंगिक विवाहावरुन (Same Sex Marriage) सुनावण्या सुरु आहेत. तर याच मुद्द्यावरुन देशभरात चर्चा सुरु आहेत. अशातच कॉफीचे (coffee) उत्पादन आणि विक्री करणाऱ्या स्टारबक्स या कंपनीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. कॉफीहाऊस कंपनी स्टारबक्सने एक जाहिरात प्रसिद्ध केली ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा वाद इतका तापला आहे की, सोशल मीडियावर BoycottStarbucks हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला आहे. या वादावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहे. स्टारबक्सने अलीकडेच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्याचा उद्देश ट्रान्सजेंडर व्यक्तींना समजून घेणे आणि स्वीकारण्याला  प्रोत्साहन देणे आहे. या जाहिरातीवरुन काही लोकांनी जेष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि टाटा कंपनीलाही या वादात खेचलं आहे.
 
10 मे रोजी स्टारबक्सने हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. स्टारबक्सची ही जाहिरात लिंग बदलाच्या मुद्द्यावर आधारीत आहे. यामुळे सोशल मीडियावर युजर्समध्ये खळबळ उडाली आहे. अर्पित आणि अर्पिताच्या जागी सलमा आणि सलमानच्या नावाने जाहिरात करता येईल का, असा सवाल लोकांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?


स्टारबक्सच्या आउटलेटमध्ये एक जोडपे त्यांचा मुलगा अर्पितची वाट पाहत होते. त्यावेळी अर्पितचे वडील त्याला फोन करतो. मात्र समोरून उत्तर मिळत नाही. काही वेळाने एक मुलगी स्टारबक्सच्या आउटलेटमध्ये येते. हा अर्पित असतो ज्याने शस्त्रक्रिया करुन त्याची मुलगी होती. अर्पितमधील हे बदल त्याचे वडील आधी स्वीकारत नाहीत. पण नंतर ते स्वीकारतात. स्टारबक्सच्या कॉफी मगवर मुलीचे नाव 'अर्पिता' लिहिण्यापासून सुरुवात होते. यानंतर वडील आपल्या मुलीला सांगतात की, माझ्यासाठी तू अजूनही माझं बाळच आहेस. तुझ्या नावात फक्त एक अक्षर जोडले आहे.


जाहिरातीच्या शेवटी स्टारबक्सने, "तुम्ही कोण आहात हे तुमचे नाव ठरवते - अर्पित किंवा अर्पिता. तुम्ही जसे आहात तसे स्टारबक्स तुम्हाला स्वीकारतो आणि प्रेम करतो. तुमचे असणचं आमच्यासाठी सर्वस्व आहे," असे म्हटलं आहे.



स्टारबक्सची जाहिरात पाहिल्यानंतर, सोशल मीडियावरील युजर्स संतापले आहेत. त्यांनी कंपनीवर 'समलिंगी विवाह' आणि 'लिंग बदलाचा' प्रचार केल्याचा आरोप केला आहे. लोक स्टारबक्सवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. एका युजरने, स्टारबक्स तुम्ही अशी जाहिरात करणाऱ्या कंपनीला कायमचे हटवा असा सल्ला दिला आहे. दुसऱ्या एका युजरने तुम्ही सलमान नाही तर सलमा या जाहिरातीला जेद्दाह, रियाध वगैरे ठिकाणी चालवाल का? असा सवाल केला आहे.


दुसरीकडे एका ट्विट युजरने टाटा समूह आणि माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.  टाटा समूह आणि स्टारबक्स कॉर्पोरेशन मिळून भारतात आउटलेट चालवतात. त्यामुळे या युजरने रतन टाटा यांना टॅग करत, "टाटा कंपन्या आणि रतन टाटा, जर तुम्ही आमच्या मुलांना टार्गेट केले तर सूड घेण्याला कोणतीही सीमा राहणार नाही... स्टारबक्सवर बहिष्कार घाला," असा इशारा दिला आहे.



दरम्यान, अनेक युजर्सना स्टारबक्सला अशा जाहिराती न करण्याचा सल्ला दिला आहे.