स्टेट बँकेच्या ग्राहकांना एटीएमचे मोफत कितीही व्यवहार
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. ग्राहकांसाठी दरमहा तीन ते पाच एटीएम मोफत व्यवहार करण्याची सवलत होती. मात्र, ही सवलत खुली केलेय. त्यामुळे यापुढे या बॅंकेचे ग्राहक आता महिन्याला कितीही व्यवहार करु शकतात.
मुंबई : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. ग्राहकांसाठी दरमहा तीन ते पाच एटीएम मोफत व्यवहार करण्याची सवलत होती. मात्र, ही सवलत खुली केलेय. त्यामुळे यापुढे या बॅंकेचे ग्राहक आता महिन्याला कितीही व्यवहार करु शकतात. दरमहा अमर्यादित एटीएम व्यवहार करण्याची मुभा स्टेट बँकेने दिलेय.
ग्राहकांसाठी ही चांगली बातमी देताना एक अट बॅंकेने ठेवली आहे. तरच तुम्हाला दरमहा अमर्यादित एटीएम व्यवहार करता येणार आहे. खात्यामध्ये किमान २५ हजारांची रक्कम राखण्याची अट घालण्यात आली आहे. आपल्या ग्राहकांना दरमहा ठरावीक एटीएम व्यवहार मोफत देण्याचे निर्देश अलिकडेच रिझर्व्ह बँकेने दिले होते. या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने हा निर्णय घेतल्याचे वृत्त हाती आले आहे.
अन्य बँकांच्याही एटीएमवरही मोफत व्यवहार
स्टेट बँक ग्राहकांच्या खात्यात किमान २५ हजारांची रक्कम असेल त्या ग्राहकांना स्टेट बँक समूहाच्या आणि अन्य बँकांच्याही एटीएमवरही अमर्याद मोफत व्यवहार करता येणार असल्याचे बँकेने म्हटलेय. ३१ ऑक्टोबर २०१८पासून स्टेट बँकेने आपल्या 'क्लासिक' आणि 'माइस्ट्रो' या डेबिट कार्डधारकांसाठी एटीएममधून रक्कम काढण्याची दैनंदिन मर्यादा ४० हजार रुपयांवरून २० हजार रुपयांवर आणलेय.
स्टेट बँकचे जे ग्राहक दरमहा खात्यामध्ये २५ हजार रुपयांची किमान शिल्लक रक्कम राखतील त्यांनाच दरमहा स्टेट बँक समूहाच्या कोणत्याही एटीएम वा अन्य एटीएमवर १० मोफत व्यवहार आणि किमान एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमान शिल्लक रक्कम जे आपल्या खात्यामध्ये ठेवतील त्यांना अन्य बँकांच्या एटीएमवरूनही अमर्याद मोफत व्यवहार करता येणार आहेत. सॅलरी खात्याच्या ग्राहकांना स्टेट बँक समूहाच्या आणि अन्य सर्व बँकांच्या एटीएमवर अमर्याद मोफत व्यवहार करता येणार असल्याचेही बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सेवा सहज उपलब्ध
स्टेट बँकेचे बचत खाते बँकेच्या अन्य शाखेत हस्तांतरित करायचे असल्यास ग्राहकांना ते सहज करता येणार आहे. स्टेट बँकेने यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी केवायसीची (नो यूवर कस्टमर) पूर्तता असणे आवश्यक आहे. तसेच, ग्राहकाचा मोबाइल क्रमांक बँकेकडे नोंदलेला असणे बंधनकारक आहे. यासाठी स्टेट बँकेचे नेटबँकिंग लॉगइन करून खात्याच्या होम पेजवर 'ई-सर्व्हिस' टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर 'ई-सर्व्हिस'सेक्शनमध्ये 'बचत खाते' या पर्यायावर उपलब्ध खाते दिसेल. अन्य शाखेत हस्तांतरित करू इच्छिणाऱ्या खात्यावर क्लिक केल्यानंतर ही सेवा सुरु होईल.