भटक्या कुत्र्यांमुळे 6 शाळा, 17 अंगणवाड्यांना सुट्टी; रेबीजमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय
Declared Holiday For 6 Schools Due To Street Dogs: मागील काही दिवसांमध्ये या ठिकाणी 4 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका महिलेचा रेबीजची लक्षणं दिसून आली. उपाचारदरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
Holiday For 6 Schools Due To Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या अनेक बातम्या आतापर्यंत तुम्ही ऐकल्या, वाचलल्या असतील. मात्र केरळमध्ये भटक्या कुत्र्यांची इतकी दहशत आहे की या कुत्र्यांच्या भीतीमुळे चक्क शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. केरळमध्ये जवळजवळ रोज भटक्या कुत्र्यांकडून कोणाला ना कोणाला तरी चावा घेतला जातो. भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे पालक मुलांना घराबाहेरही सोडत नाहीत, अशी स्थिती आहे. याचमुळे कोझिकोड जिल्ह्यातील कुथली पंचायतीने कुत्र्यांचे हल्ले थांबवण्यासाठी आपल्या हद्दीतील 6 शाळा आणि 17 अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली.
चावा घेतलेल्यांमध्ये रेबीजची लक्षणं
पंचायतीच्या अध्यक्षांनी नुकत्याच घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सहाय्यक शिक्षण अधिकारी आणि मुख्यध्यापकांबरोबर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वीच एका भटक्या कुत्र्याने 4 जणांना चावा घेतला होता. यामध्ये 2 महिलांचाही समावेश होता. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींमध्ये रेबीजची लक्षणं दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चावा घेतलेल्या महिलेंपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
सर्व कुत्र्यांना पकडणं शक्य नाही
या परिसरातील सर्वच कुत्र्यांना पकडणं शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच लहान मुलांच्या सुरक्षेचा विचार करुन शिक्षण संस्थांनी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी या ठिकाणी शाळाच भरल्या नाहीत. या भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास एवढा वाढला आहे की त्याचा परिणाम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी योजनेसारख्या योजनेवरही पडला आहे.
महिलेचा रेबीजमुळे मृत्यू अन् गावात दहशत
कूथली पंचायतचे अध्यक्ष बिंदू केके यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लानंतर एका भटक्या कुत्र्याला पकडण्यात आलं आहे. या कुत्र्याची लाळ रेबीज विषाणूचा संसर्ग त्याला झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पंचायतीने सतर्कता समितीची बैठकही घेतली आहे. कुत्र्यांच्या समस्येमुळे शाळांना सुट्टी द्यावी लागतेय हे फारच खेदजनक असल्याचं पंचायतीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका महिलेला कुत्रा चावला होता. मात्र लसीकरणानंतरही या महिलेचा रेबीजमुळे मृत्यू झाला.
मुलाचा मृत्यू झाला
काही महिन्यांपूर्वी कन्नूर जिल्ह्यातील मुजुपिलांगड येथील एका घटनेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने 11 वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या मुलाला ऑटिझमचा त्रास होता. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.