नवी दिल्ली : एकीकडे शाळेत विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत असताना दिल्लीत एका विध्यार्थाने मुख्याध्यापकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याने लोखंडी रोडने मुख्याध्यापकांना मारहाण केली असून त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला. मेवा लाल असे मारहाण करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेवा लाल सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शाळेमध्ये देखरेख करत असताना नववीतील एक विद्यार्थी शिक्षक वर्गात शिकवत असताना मोबाईलवर काहीतरी करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी लगेचच त्या मुलाला जवळ बोलावून त्याला ओरडले आणि त्याचा मोबाईल जप्त केला. त्याचबरोबर पालकांना भेटायला घेऊन ये, असे बजावले. 


संबंधित विद्यर्थ्याने मुख्यध्यापकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व मोबाईल त्याच्याकडे दिला. पण घातलेल्या प्रकरणाचा राग डोक्यात असल्याने त्याने नंतर शाळेच्या मैदानात मुख्याध्यापकांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे वार त्याने हातापायांवर केले. त्यानंतर तेथे उपस्थित विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी यांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याला अडवले. पण जर त्याला अडवले नसते तर माझा जीव देखील गेला असता, असे मेवा लाल यांनी तक्रारीमध्ये सांगितले.