Students Make Bomb With Help Of YouTube: विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मस्करी करण्याचे प्रकार यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकले असतील. मात्र एका शाळेतील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षिकेबरोबर प्रँक करण्याच्या नादात चक्क शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू लावून स्फोट घडवून आणल्याचा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांना हे बॉम्ब सदृश्य स्फोटकं बनवण्याची माहिती युट्यूबवरुन मिळली. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून या तरुणांनी स्फोटकं तयार केल्याचं उघड झाल्यानंतर त्यांना शाळेने या कृत्यासाठी निलंबित केलं आहे. हा सारा प्रकार हरियाणामधील शाळेत घडला आहे.


रिमोटने घडवला स्फोट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदैवाने या साऱ्या प्रकारामध्ये शिक्षिकेला कोणतीही इजा झाली नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने एका आठवड्यासाठी निलंबित केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षिकेने या विद्यार्थ्यांना दम भरला होता. हाच राग मनात ठेऊन या विद्यार्थ्यांनी युट्यूबवरुन स्फोटकं बनवण्याची माहिती घेतली. एका विद्यार्थ्यानं छोट्या बॉम्बेसारख्या आकाराची स्फोटकं शिक्षिकेच्या खुर्ची खाली ठेवली. दुसऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षिका खुर्चीवर बसल्याने रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने या घरी तयार केलल्या बॉम्बेचा स्फोट घडवून आणला.


शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची शाळेला भेट


हरियाणा शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर प्रकरणात सहभागी असलेल्या 13 विद्यार्थ्यांना आठवडाभरासाठी शाळेतून निलंबित केलं आहे. या विद्यार्थ्यांनी आपण युट्यूबवरील व्हिडीओ पाहून बॉम्ब तयार केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली आणि तेथे पहाणी केली. या प्रकरणाचा एक अहवालही तयार करण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात पंचायतही भरवण्यात आली असता वर्गातील एकूण 15 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांना वर्गात हा असला काहीतरी प्रकार होणार असल्याची कल्पना असल्याचं स्पष्ट झालं.


...म्हणून शाळेतून काढलं नाही


या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा विचार शाळा प्रशासनाने केला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनाअट माफी मागितली.  तसेच मुलं यापुढे असं काहीही करणार नाही असं लेखी आश्वासन या पालकांनी दिलं. शिक्षिकेनंही या विद्यार्थ्यांना माफ केल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं नाही. जिल्हा शिक्षण विभागाचे प्रमुख नरेश मेहता यांनी शिक्षिकेने मुलांना माफ केल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलेलं नाही असं स्पष्ट केलं. मात्र या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासंदर्भातील मनासिकतेवर अधिक चर्चा होणं गरजेचं असल्याचं अधोरेखित झालं आहे.