Coronavirus: पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही सर्व शैक्षणिक संस्था बंदच आहेत.
रायपूर: कोरोना व्हायरसच्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे राज्यातील शिक्षणसंस्था बंद पडल्यामुळे छत्तीसगढ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत ढकलण्यात येईल. अकरावीतील विद्यार्थ्यांनाही अशाचप्रकारे उत्तीर्ण करण्यात येणार आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांना तसे निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सरकारने १९ मार्चपासून सर्व शाळा बंद केल्या होत्या. तसेच सर्व परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही सर्व शैक्षणिक संस्था बंदच आहेत. सध्याची परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सर्व परीक्षा घेणे शक्य नाही. परिणामी सरकारने पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १३९७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १२४ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.