नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त करावे. अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, अशा इशारा भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला. उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजकीय व आर्थिक वर्तुळात याचे मोठे पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले की, उर्जित पटेल यांचा राजीनामा भारतीय अर्थव्यवस्था, रिझर्व्ह बँक आणि सरकार या सगळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. उर्जित पटेल यांनी किमान जुलै महिन्यापर्यंत गव्हर्नरपदावर राहिले पाहिजे. जेणेकरून नवे सरकार सत्तेत आले असेल. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी उर्जित पटेल यांना बोलावून राजीनाम्याचे नेमके कारण विचारले पाहिजे. तसेच व्यापक जनहितासाठी त्यांना राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त करावे, असे मत स्वामी यांनी मांडले. 


दुसरीकडे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. ज्याप्रकारे उर्जित पटेल यांना राजीनामा द्यावा लागला ते आपल्या आर्थिक व बँकिंग व्यवस्थेसाठी लांछनास्पद आहे. भाजप सरकारने एकप्रकारे आर्थिक आणीबाणी निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केलेय. त्यामुळे देशाची विश्वासर्हता आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे, असे पटेल यांनी म्हटले. उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होते. रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये पटेल यांच्याकडे तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता.