नवी दिल्ली - नववर्षाच्या पूर्वसंध्येला सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने देशातील ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. एलपीजी सिलिंडर अर्थात घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. अनुदानित गॅस सिलिंडरचे दर ५.९१ रुपयांनी आणि विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर १२०.५० रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईल कार्पोरेशनकडून नुकतीच ही घोषणा करण्यात आली. 


गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने कमी होत आहेत. या वर्षांतील पेट्रोलच्या नीचांकी दराची काही दिवसांपूर्वीच नोंद करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात येत आहेत. त्यानंतर आता घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा दरही तेल कंपन्यांकडून कमी करण्यात आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.