Success Story: तंत्रज्ञान क्षेत्रीत अनेक भारतीयांना आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. त्यातही सुंदर पिचाई, सत्या नडेला, पराग अग्रवाल, थॉमस कुर्रियनसह अनेक भारतीयांनी थेट अमेरिकेत जाऊन संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ही नावं तशी प्रसिद्ध असून ती प्रत्येकाच्या तोंडी असतात, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. दरम्यान या यादीत काही अशी नावंही आहेत जी प्रसिद्ध झाली नाहीत. पण कौशल्याच्या बाबतीत ते अजिबात मागे नाहीत. याच यादीतील एक नाव म्हणजे यामिनी रंगन (Yamini Rangan) आहे. यामिनी रंगन यांनी छोट्या शहरातून थेट परदेशात जाऊन यशाचा झेंडा रोवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तंत्रज्ञान क्षेत्रात यामिनी रंगन यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचं नाव अमेरिकेत फार सन्मानाने घेतलं जातं. एक यशस्वी सीईओ म्हणून त्यांची ओळख असून अमेरिकेत त्या 25.66 बिलियन डॉलर्स म्हणजेच 2 लाख कोटींहून अधिक नेटवर्थ असणारी कंपनी सांभाळत आहेत. त्या डेव्हलपर आणि सॉफ्टवेअर कंपनी फर्म हबस्पॉटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. वयाच्या 21 व्या वर्षी अमेरिका गाठणाऱ्या यामिनी रंगन यांचा यशाचा हा प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेऊयात. 


पहिल्या नोकरीत हॉटेलमध्ये वाढलं जेवण


आपलं स्वप्न साकार करण्यासाठी यामिनी रंगन वयाच्या 21 व्या वर्षी भारतातून अमेरिकेत दाखल झाल्या होत्या. हा प्रवास तितका सोपा नव्हता. यामिनी रंगन यांना करिअरच्या सुरुवातीला फार संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या काळात यामिनी यांना अमेरिकेत राहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या खिशात फक्त 150 डॉलर्स शिल्लक होते. अशा स्थितीत त्यांना नोकरी करणं गरजेचं होतं. 


डीएनएच्या रिपोर्टनुसार, यामिनी यांनी अटलांटाच्या फुटबॉल स्टेडिअममध्ये सर्वात पहिली नोकरी केली. तिथे त्यांनी रेस्तराँमध्ये जेवण वाढलं. यामिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना नेहमीच स्वतंत्र राहायचं होतं. आपण ना परत घऱी जाऊ शकत होतो, ना आई-वडिलांकडे पैसे मागण्याची इच्छा होती. 


भारतात शिक्षण पूर्ण, अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांसह काम


यामिनी रंगन यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याआधी कोईम्बतूरच्या भरथियार युनिव्हर्सिटीतून कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्यूएशन केलं. यानंतर बर्कले येथून एमबीए केलं. 


आपल्या इतक्या मोठ्या यशस्वी करिअरमध्ये यामिनी यांनी SAP, ल्यूसेंट, वर्कडे आणि ड्रॉपबॉक्स यासारख्या आयटी दिग्गजांसह काम केलं आहे. यानंतर 2020 मध्ये त्यांनी चीफ कस्टमर एक्झिक्यूटिव्ह म्हणून हबस्पॉटमध्ये काम सुरु केलं.