Success Story: कधी 18 रुपयांच्या पगारासाठी भांडी धुवायचे, आज 300 कोटींच्या व्यवसायाचे मालक
Jayaram Banan Success Story: जयराम यांनी भारतासह जगभरात करोडो रुपयांची फूड चैन सुरु केली आहे.
Jayaram Banan Success Story: हॉटेलमध्ये भांडी घासणारा वेटर कधी 300 कोटींचा मालक होईल, असा विचार कधी केलाय का? हो. प्रामाणिक मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही. सागर रत्ना या रेस्टोरंट साखळीचे मालक जयराम बानन यांनी हे शक्य करुन दाखवलंय. वडिलांनी मारलं म्हणून त्यांनी घर सोडलं. पण हार मानण्याऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवला आणि करोडो रुपयांची फूड चैन सुरु केली आहे. ते दरवर्षी कोट्यावधींची कमाई करतात. जयराम बानन यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
कर्नाटकातील मंगळूर येथील उडुपीच्या सामान्य परिवारात जन्मलेल्या जयराम यांचे वडिल ड्रायव्हर होते. स्वभाव रागीष्ट असल्याने जयराम आपल्या वडिलांना खूप घाबरायचे. अशातच जयराम शाळेच्या परिक्षेत नापास झाल्याने वडिलांनी त्यांना खूप मारले. त्यामुळे अवघ्या 13 वर्षाच्या वयात त्यांनी घर सोडले. घरुन निघण्याआधी त्यांनी आपल्या वडिलांच्या पॉकेटमधून काही पैसै काढले आणि ते मंगळूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. 1967 साली जयराम मुंबईत आले.
भांडी घासण्याचा 18 रुपये पगार
मुंबईत आलो खरे पण काय काम करायचे, पुढे आपले कसे होईल? याबद्दल जयराम यांना काही माहिती नव्हती. त्यांच्या ओळखीची एक व्यक्ती येथे रेस्टॉरंट चालवत होती. कमी वय असल्याने त्यांना फारसे काही येतही नव्हते. अशावेळी ते भांडी घासण्याचे काम करायचे. या कामासाठी त्यांना 18 रुपये इतका पगार मिळायचा. पण जयराम यांची मेहनत पाहून त्यांना आधी हॉटेल वेटर आणि नंतर मॅनेजर बनवण्यात आले. तसेच त्यांचा पगार 200 रुपये करण्यात आला.
पहिली कमाई 408 रुपये
जयराम मिळणाऱ्या पगारात आणि कामात समाधानी नव्हते. त्यांना स्वत:चं असं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे 1974 साली मुंबई सोडून ते दिल्लीला गेले आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. गाझियाबादच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये त्यांनी कॅंटीन सुरु केलं. स्वत:कडे थोडीशी सेव्हिंग होती त्यात मित्रांकडून उधारी घेत त्यांनी काम सुरु केले. 2000 रुपये गुंतवून त्यांनी कामाला सुरुवात केली. 1986 मध्ये त्यांनी साऊथ दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये सागर नावाचे पहिले हॉटेल उघडले. लोकांना या हॉटेलचा स्वाद आवडला. पहिल्या दिवशी खूप गर्दी झाली आणि जयराम यांनी 408 रुपये कमावले.
सागर-रत्न' नावाचा स्टार्टअप
जयराम यांना व्यवसायाची आयडिया आली होती. त्याला मेहनतीची जोड होती. दर्जा तर उत्तमच होता. त्यामुळे हॉटेलमध्ये लोकांची रांग लागायची. लोकांना साऊथ इंडियन डिश आवडत होत्या. या यशानंतर दिल्लीच्या लोधी मार्केटमध्ये त्यांनी आणखी एक हॉटेल उघडले. आपले क्वालिटी फूड त्यांनी 20 टक्के जास्त किंमतीने द्यायला सुरुवात केली. अशाप्रकारे त्यांनी आपला 'सागर-रत्न' नावाच्या स्टार्टअपची सुरुवात केली. आजच्या घडीला दिल्लीमध्ये त्यांचे 30 हून अधिक रेस्टॉरन्ट आहेत. तर उत्तर भारतात त्यांच्या रेस्टॉरंन्टची संख्या 60 हून अधिक झाली आहे.
जगभरात 100 रेस्टोरन्ट्स
एवढेच नव्हे तर कॅनडा, सिंगापूर, बॅंकॉक अशा देशांमध्येही त्यांचे आऊटलेट्स आहेत. जयराम यांचा वार्षिक टर्नओव्हर 300 कोटींपेक्षा अधिक आहे. 'सागर रत्न' व्यतिरिक्त त्यांनी 2001 मध्ये स्वागत नावाची रेस्टोरन्ट चैन सुरु केली. जयराम यांची ख्याती इतकी पसरली की लोकं त्यांना नॉर्थचा डोसा किंग म्हणून ओळखतात. आज जगभरात त्यांचे 100 रेस्टोरन्ट्स असून ते वर्षाला करोडोंचा व्यवसाय करतात. स्वत:च्या हिम्मतीवर उभ्या राहू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी जयराम यांची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.