आठवणीतल्या सुषमा स्वराज : राजकीय कारकीर्दीचा तेजस्वी आलेख
सुषमा स्वराजांची गौरवशाली कारकीर्द
मुंबई : सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख कायम तेजस्वी राहिला. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री, सर्वोत्कृष्ट संसदपटू आणि लोकाभिमुख परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गौरवशाली राहिली.
प्रखर आणि तेजस्वी वक्ता आणि कुशल प्रशासक अशी सुषमा स्वराज यांची ओळख. ज्यांनी उत्तर भारत आणि दक्षिण भारतातून निवडणूक लढवली, त्या सुषमा एकमेव नेत्या. २००८ आणि २०१० मध्ये असामान्य संसदपटू पुरस्कार मिळवलेल्या त्या एकमेव संसदपटू. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलनं त्यांचं वर्णन बेस्ट लव्ह्ड पॉलिटिशियन अर्थात सर्वाधिक लोकप्रिय नेत्या असं केलं होतं.
१४ फेब्रुवारी १९५३ मध्ये हरियाणातल्या अंबालामध्ये जन्मलेल्या सुषमांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७० च्या दशकात अभाविपच्या माध्यमातून केली. सुषमा स्वराज यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते.
महाविद्यालयात सुषमा स्वराज सर्वोत्कृष्ट ncc कॅडेट आणि आदर्श विद्यार्थिनी ठरल्या. कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यावर १९७३ मध्ये सुषमा स्वराजांनी वकिली सुरू केली. १९७५ मध्ये त्यांचा विवाह सर्वोच्च न्यायालयात वकील असणाऱ्या स्वराज कौशल यांच्याशी झाला. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सुषमा यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्या जनता पार्टीच्या सदस्य झाल्या.
१९७७ मध्ये सुषमा स्वराज यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. २५ व्या वर्षी सर्वाधिक कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा मान सुषमा स्वराज यांना मिळाला.
१९९० मध्ये सुषमा स्वराज राज्यसभेत खासदार म्हणून गेल्या. १९९६ मध्ये आणि १९९८ मध्ये सुषमा वाजपेयींच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री झाल्या. चित्रपट क्षेत्राला इंडस्ट्री अर्थात उद्योगाचा दर्जा सुषमा स्वराज यांनी दिला. त्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी बँकांकडून पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
१२ ऑक्टोबर १९९८ ला सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९९ ला कर्नाटकातल्या बेल्लारीमधून सुषमांनी सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवली. २००९ ते २०१४ या काळात सुषमा विरोधी पक्षनेत्या होत्या. यूपीए सरकारला धारेवर धरण्यात सुषमा यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर २०१४ मध्ये मोदी मंत्रिमंडळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून अत्यंत सक्षम आणि लोकाभिमुख भूमिका निभावली. २०१९ मध्ये प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणानं त्यांनी निवडणूक लढवली नाही.