लखनऊ : महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार लखनऊ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणा स्थळ व्हावं, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे, मुगलसम्राट औरंगजेबाने ज्या क्रूरतेने महाराजांना आग्र्यामध्ये जेरबंद केले होते, तितक्याच चपळाईने मोगलांच्या डोळ्यात धूळ फेकत महाराजांनी केलेली स्वतःची सुटका म्हणजे साहस, शौर्य, चतुराई आणि उत्तम कार्ययोजनेचे आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला या जाज्वल्य इतिहासाची सतत आठवण राहावी यासाठी आग्रा इथं महाराजांचे प्रेरणा स्थळ व्हावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भूमिका ही भारतीय संस्कृतीचे स्फुल्लिंग चेतवणारी आणि विरासतीची जोपासना करणारी आणि त्या माध्यमातून भावी पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी अश्या प्रेरणादायी स्थळांचा विकास करणारी आहे, असंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. 


महाराष्ट्राच्या मनामनांत आणि घराघरात पुज्यस्थानी असलेल्या शिवाजी महाराजांच्या आठवणी आगरा या शहराशी जुळलेल्या आहेत. म्हणूनच इथं महाराजांचं प्रेरणा स्थळ व्हायला हवं, यासाठी आगरा इथले आमदार योगेंद्र उपाध्याय आणि काही इतिहाकारांनी स्थान निश्चित करावं असेही ते म्हणाले. 


उत्तर प्रदेश पर्यटन मंत्र्यांकडून प्रस्ताव देखील पाठविण्यात आला असल्याची माहिती देत त्यांनी यासाठी मी स्वतः आणि महाराष्ट्र सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा तसंच पर्यटन मंत्री नीळकंठ तिवारी, विधिमंडळाचे मुख्य सचेतक, आ. योगेंद्र उपाध्याय यांचे सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकर घेतल्याबद्दल आभार मानले.