सुधीर मुनगंटीवार विधानसभेत भडकले
विधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज चांगलेच संतापले.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज चांगलेच संतापले. एकाच लक्षवेधीत दोन खात्यांचा प्रश्न विचारण्यात आल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुलडाणा येथील लोणार सरोवरप्रकरणी पर्यटन विभागाचा आणि वन विभागाचा प्रश्न एकत्र करण्यात आला होता. मात्र कोणत्याही लक्षवेधीत विधिमंडळ कायद्यानुसार दोन विभागाचे प्रश्न एकत्र करता येत नाहीत ही बाब मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली. तसेच त्यावर संताप व्यक्त केला.
गेल्या काही काळात असा प्रकार तिसऱ्यांदा घडला असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करा, अशी थेट मागणी मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त करत केली. केंद्राच्या धर्तीवर आता अशा अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं. तसंच ट्रेझरीला (कोषागार) सांगून यांचे निवृत्तीवेतन बंद करतो, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. अखेर वन विभागाचं उत्तर वनमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांनी द्यावं आणि पर्याटन विभागाची लक्षवेधी राखून ठेवण्यात येत असल्याचा निर्णय तालिका अध्यक्षांनी दिला.