Threat Letter over Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आत्मघाती बॉम्ब हल्ला (Suicide Bomb Attack) करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. सोमवारपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून त्याआधीच हल्ल्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पत्र कोचीमधील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि तपासा सुरुवात झाली. 


या पत्रावर एक पत्ता लिहिण्यात आला होता. पोलिसांनी या पत्त्यावर पोहोचून एन के जॉनी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही राजीव गांधींप्रमाणे हत्या करण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान कोचीमधील रहिवासी असणारे जॉनी यांनी आपण असं कोणतंही पत्र लिहिलं नसल्याचं म्हटलं आहे. आपल्याविरोधात मनात राग असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने ही धमकी दिली असावी असं ते म्हणाले आहेत. 


जॉनी यांनी याप्रकरणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पोलिसांनी घरी येऊन पत्राबद्दल चौकशी केली असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, "पोलिसांनी पत्रातील हस्ताक्षराची माझ्या हस्ताक्षराशी तुलना करुन पाहिली. मी या पत्रामागे नाही याची त्यांना खात्री पटली आहे. माझ्याविरोधात मनात राग असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने ही धमकी दिली असावी. माझा ज्यांच्यावर संशय आहे अशा काहींची नावं मी पोलिसांना सांगितली आहेत".


यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी राज्यातील पोलिसांवर टीका केली आहे. पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासंबंधी सुरक्षेशी संबंधित व्हीव्हीआयपी प्लान लीक केल्याचा त्यांचा आरोप आहे. “केरळमध्ये धार्मिक अतिरेकी संघटना खूप मजबूत आणि सक्रिय आहेत. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा अहवाल माध्यमांसमोर आला आहे. त्यात प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), SDPI आणि माओवाद्यांसह अनेक संघटनांचा संदर्भ आहे. पण राज्य सरकार या संघटनांना संरक्षण देत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.