सूर्यकिरणांनी लाकूड जाळत अविश्वसनीय चित्र रेखाटणारा जगावेगळा चित्रकार... Video वाऱ्याच्या वेगानं व्हायरल
Trending News : रणरणत्या उन्हात सूर्यकिरणांचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाय का? नाही? पाहा गोष्ट देशातील एका अशा कलाकाराची आणि कलेची ज्यानं भल्याभल्यांना भारावून सोडलंय.
Trending News : सूर्यकिरणांचा वापर नेमका काय? असं विचारलं असता तुम्हीआम्ही लगेचच शालेय दिवसांमध्ये विज्ञानाच्या अभ्यासक्रमात जे काही शिकलो त्याची उजळणी करतो. क्षणात उत्तरही देतो. सूर्यकिरणांमुळे अमुक होतं, तमुक कामात मदत मिळते, वगैरे वगैरे. पण, कधी तुम्ही सूर्यकिरणांपासून चित्र रेखाटल्याचं पाहिलंय का? 100 टक्क्यांपैकी 5 टक्के वाचकांचं उत्तर 'हो'कारार्थी असेल. पण, उरलेल्यांसाठी हे एक आश्चर्यच.
सध्या चर्चेच्या अनेक मुद्द्यांमध्ये नजरा वळवणारा विषय म्हणजे Sunlight Art. आता तुम्हीही म्हणाल हे काय रे भाऊ? तर, हा एक कलेचा असा प्रकार आहे ज्यामध्ये सूर्याची किरणं, लाकूड आणि भिंगाचा वापर करत अतिशय संयमानं उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते. सोशल मीडियामुळं एका दक्षिण आफ्रिकेच्या कलाकारानं ही कला जगाच्या कोपऱ्यात पोहोचवल्याचं लक्षात आलं. भारतात मात्र ही कला साकारण्याची किमया केली विग्नेश नावाच्या एका तरुणानं.
हेसुद्धा वाचा : 'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video
indian_artists_club__ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही दिवसांपूर्वीच विग्नेशनं रेखाटलेल्या विराट कोहलीच्या चित्राचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला असंख्य व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. बऱ्याचजणानी तो रिपोस्ट केला. तर, काहींनी हा तरुण नेमकं काय करतोय हे जाणून घेण्यासाठी त्याच्या प्रोफाईलकडे धाव मारली. तिथं जाऊन लक्षात आलं की, हा तर एक कमाल कलाकार आहे....
आजारपणावर मात करत अनोख्या कलेत स्वत:ला झोकणारा विग्नेश
माध्यमांशी संवाद साधताना विग्नेशनंच सांगितल्यानुसार 2019 मध्ये त्याला एका अशा आजारानं ग्रासलं ज्यामुळं तो अंथरुणाला खिळला. त्याला चालणंही कठीण झालं. त्याचवेळी त्यानं अमेरिकेतील एका लोकप्रिय सनलाईट आर्टिस्टचा व्हिडीओ पाहिला. पहिल्या क्षणापासूनच तो या अनोख्या कलेच्या प्रेमात पडला. ज्यानंतर त्यानं हातात लाकडाचा तुकडा आणि भिंग घेत सूर्यप्रकाशात जाणं सुरु केलं. त्यानं व्हिडीओमध्ये पाहिल्यानुसार सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेला भिंग धरून ते काहीसं वळवलं आणि लाकडाचा पृष्ठ जाळत त्यानं उत्तमोत्तम कलाकृती साकारण्यास सुरुवात केली.
मागच्या दोन वर्षांमध्ये विग्नेशनं या कलेमध्ये निपुण होत आता तो अनेक सेलिब्रिटींचीही सनलाईट आर्ट्स साकारताना दिसतो. सूर्याची किरणं भिंगावर पडल्यानंतर लाकडावर जाणाऱ्या किरणांवाटे ती धुमसण्यास सुरुवात होते, धूर निघतो आणि विग्नेश त्यालाच आकार देत कलाकृती पूर्ण करतो. एका अद्वितीय कलेचा नमुना सर्वांपुढे सादर करणारा विग्नेश हा भारतातील पहिलाच सनलाईट आर्टिस्ट असल्याचा दावा तो करतो. त्याची ही कला आणि कलेप्रती असणारं समर्पण पाहता अनेक नवख्या कलाप्रेमींनीही या कलेबाबतच कुतूहलपूर्ण प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला कशी वाटली ही आगळीवेगळी कला?