Vicky Kaushal Katrina Kaif : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नातं अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच होतं. कारण, बऱ्याच वर्षांपूर्वी हिंदी कलाजगतामध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कतरिनाच्या आयुष्यात त्याचं येणं पूर्णपणे अनपेक्षित. त्याहूनही त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव देणं याची क्वचित मित्रमंडळी वगळता इतर कोणालाही कल्पनाच नव्हती. हो, पण विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांना मात्र या जोडीनं घेतलेल्या या निर्णयानं प्रचंड आनंद झाला.
काही कमाल चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हाच विकी फार कमी काळातच प्रसिद्धीझोतात आला. जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यानं लग्न करत खासगी आयुष्यालाही तितकंच प्राधान्य दिलं. पण, आता अचानकच त्याच्या आणि कतरिनाच्या घटस्फोटाच्या प्रश्नांनी सर्वांच्या नजरा वळवल्या.
विकीनं नुकतंच त्याच्या आगामी Zara Hatke Zara Bachke या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. अभिनेत्री सारा अली खानसुद्धा त्याच्यासोबत होती. सारा आणि विकी या चित्रपटात स्क्रीन शेअर करत असल्यामुळं या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. तितक्यातच एका प्रश्नानं विकीला हादराच बसला.
प्रश्नोत्तरं आणि संवाद असं सर्वकाही खेळीमेळीच्या वातावरणात सुरु होतं. तितक्यातच तिथं आलेल्या पत्रकारांपैकीच एकानं विकीला विचित्र प्रश्न विचारला. 'कतरिनापेक्षाही उत्तम अभिनेत्री भेटल्यास तिला घटस्फोट देऊन त्या अभिनेत्रीशी लग्न करशील का?', असा प्रश्न विकीला विचारला गेला.
हा प्रश्न विचारताच तिथं असणाऱ्या सारा अली खानच्याही भुवया उंचावल्या. इतकंच काय तर इतरही पत्रकारांना धक्का बसला. या प्रश्नावर नेमकं व्यक्त कसं व्हायचं हे विकीलाही कळेना. शेवटी तो अडखळतच म्हणाला, 'सर... ऐका मला संध्याकाळी घरीपण जायचंय. असे वेडेवाकडे प्रश्न विचारताय. मित्रांनो लहान आहे मी अरे... कसं उत्तर देऊ मी, इतका 'खतरनाक' प्रश्न विचारलाय यांनी' असं म्हणताना कतरिनासोबतचंच नातं आपण जन्मोन् जन्म निभावणार असल्याचं विकी म्हणाला.
तिथं विकीनं या प्रश्नाचं उत्तर त्याच्या पद्धतीनं दिलेलं असतानाच इथं सोशल मीडियावर मात्र हा व्हायरल व्हिडीओ अनेकांनाच संताप देऊन गेला आहे. काही नेटकऱ्यांनी 'हा काय वायफळ प्रश्न विचारलाय?' म्हणत माध्यमांच्या त्या प्रतिनिधींवर निशाणा साधला. बऱ्याचदा कलाकार मर्यादांचं पालन करत मोठ्या आदरानं परिस्थिती हाताळताना दिसतात. पण, अनेकदा माध्यमांकडून मात्र मर्यादेची ही रेष ओलांडली जाते. इथं किमान भान राखणं कधीही फायद्याचं...असाही सूर चाहते आणि नेटकऱ्यांनी आळवला.