सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसुद्दीन अमनुल्लाह यांनी यादरम्यान दोघांना अत्यंत कडक शब्दांत सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं जाणुनबुझून, इच्छेने आणि वारंवार उल्लंघन करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी मागितलेल्या सर्व माफी फेटाळताना आपण आंधळे नाही आहोत अशा शब्दांत सुनावलं आहे. तसंच आम्ही या प्रकरणी उदार होऊ इच्छित नाही असंही सांगितलं. पतंजली विरोधात इतके दिवस कारवाई न केल्याबद्दल कोर्टाने उत्तराखंड परवाना प्राधिकरणावर ताशेरे ओढले. तसंच केंद्राने दाखल केलेल्या उत्तरावर आपण समाधानी नसल्याचं सांगितलं आहे. 


सुनावणीदरम्यान वकील रोहतगी यांनी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्रं वाचून दाखवली. यावर कोर्टाने म्हटलं की, "त्यांची माफी कागदावरच आहे. आम्ही ही माफी स्विकारण्यास नकार देतो. त्यांनी जाणुनबुजून उल्लंघन केलं असं आम्ही समजत आहोत. प्रतिज्ञापत्र नाकारल्यानंतर आता पुढील कारवाईला तयार राहा". 


खंडपीठाने यावेळी परदेशातील प्रवासाच्या योजनांचा हवाला देत न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मागणाऱ्या बाबा रामदेव यांच्यावर ताशेरे ओढले. प्रतिज्ञापत्रात त्यांनी खरेजी केलेलं तिकीटही जोडण्यात आलं होतं. "अवमान प्रकरणात, जेव्हा तुम्ही माझ्याकडे परदेशात जाण्यासाठी तिकीट असल्याचे सांगून सूट मागता, नंतर तुम्ही म्हणता की माझ्याकडे ते नाही? तुम्ही ही प्रक्रिया अतिशय हलक्यात घेत आहात," असं सांगत खंडपीठाने या घटनेला "खोटी साक्ष" म्हणत ताकीद दिली.


खंडपीठाने यावेळी आपला माफीनामा कोर्टात दाखल करण्याआधी मीडियात प्रसिद्ध करत सार्वजनिक केल्याबद्दलही ताशेरे ओढले. "ते आधी मीडियाला पाठवतात. काल 7.30 वाजेपर्यंत हा माफीनामा अपलोड झाला नव्हता. त्यांचं लक्ष प्रसिद्धीकडे आहे हे स्पष्ट दिसत आहे," असं खंडपीठ म्हणालं. 


सुप्रीम कोर्टाने पतंजली उत्पादनांसाठी परवाना दिल्याबद्दल उत्तराखंड सरकारला फटकारलं. तसंच तीन औषध परवाना अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे असं म्हटलं. "जेव्हा त्यांनी (पतंजली) तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचं उल्लंघन केलं, तेव्हा तुम्ही काय केलं? बसून बोटं मोडत होतात का? आम्ही तुम्हाला फटकारण्याची वाट पाहत आहात?" असा सवाल न्यायमूर्ती कोहली यांनी केला.


याप्रकरणी 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना यावेळी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.