निर्भया प्रकरण : फाशी शिक्षा जन्मठेपेत करण्याची पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करावी यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ता याची बचाव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळ्याने त्याची फाशीची शिक्षा कायम आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने पवनची याचिका फेटाळली. त्याचबरोबर त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.
दुसरीकडे पवन याच्याकडे आता राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी केले आहे. या दोषींना उद्या ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना फाशी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
0