कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात अनेकांनी त्यांचा जीव गमावला. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही भरपाई देण्यातंही आली. मात्र काही लोकांनी याचा गैरफायदा घेत भरपाई घेण्यासाठी खोटे दावे करत असल्याचं समोर आलं होतं. ही बाब लक्षात आल्यावर सुप्रीम कोर्टाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची भरपाई मिळवण्यासाठी खोटे दावे दाखल केल्याच्या आरोपांची चौकशी करवी, अशी परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये दाखल केलेल्या दाव्यांपैकी 5% दाव्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान यावेळी सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी 28 मार्चपर्यंत 60 दिवसांची मुदत दिली आहे. तर भविष्यात होणाऱ्या मृत्यूची भरपाई मिळण्यासाठीचा दावाही 90 दिवसांच्या आत करावा लागणार आहे.
4 राज्यांमध्ये होणार तपास
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर, केंद्र सरकार 4 राज्यांमध्ये 5% नुकसान भरपाईच्या दाव्यांची पडताळणी करणार आहे. या दाव्यांची संख्या आणि नोंदवलेल्या मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत दिसतेय. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कोरोनाच्या नुकसान भरपाईसाठी खोटे दावे दाखल करण्याच्या चौकशीची परवानगी दिलीये.