सुप्रीम कोर्टाने नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन पतंजली आयुर्वैदला कडक शब्दांत फटकारलं आहे. अ‍ॅलोपॅथिक औषधांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने पतंजली आयुर्वेदला चांगलंच फटकारलं आहे. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी पतंजलीला इशारा दिला की, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरू राहिल्यास 1 कोटींचा दंड आकारला जाईल आणि हा दंड प्रति-उत्पादन आधारावर लागू होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाने पतंजली आयुर्वेदला इशारा देत भविष्यात अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करु नयेत असं सुनावलं आहे. तसंच प्रसारमाध्यमांसमोर आकस्मिक विधानं करु नयेत अशीही सूचना केली आहे. 


इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वैदविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अ‍ॅलोपॅथीचा अपमान करत असून काही आजार बरे करण्याचे खोटे दावे करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. याच याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.


इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीचे दावे पडताळण्यात आलेले नसून, ते ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, 1954 आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 सारख्या कायद्यांचे थेट उल्लंघन करणारे असल्याचा आरोप केला आहे. 


सुप्रीम कोर्टाने यावेळी केंद्र सरकारला या संदर्भात व्यावहारिक शिफारशी आणण्याची सूनचा केली आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.