कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद आता आणखीनच चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी नॉर्थ २४ परगणा या भागात काही लोकांनी ममता बॅनर्जी यांच्यासमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर ममतांनी चांगलेच आकांडतांडव केले होते. हे लोक म्हणजे भाजपने बाहेरून आणलेले गुन्हेगार आहेत. या लोकांनी माझ्याबद्दल अपशब्द उच्चारले. हे लोक बंगालमधील असूच शकत नाहीत, असे ममतांनी म्हटले होते. यानंतर ममता विरोधक आणखीनच चेकाळले असून त्यांच्याकडून सातत्याने ममतांविरोधात सोशल मीडियावर मिम्स व्हायरल केले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी ममतांना लक्ष्य केले आहे. बाबुल सुप्रियो यांच्या असनसोल मतदारसंघातून ममतांना गेट वेल सून (लवकर बऱ्या व्हा) असा संदेश लिहलेली कार्डस् पाठवण्यात येणार आहेत. ममता बॅनर्जी या अनुभवी राजकारणी आहेत. मात्र, त्यांचे सध्याचे वर्तन अस्वाभाविक आणि विचित्र आहे. ममतांनी मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी काही दिवस आराम करावा, असा उपरोधिक टोला बाबुल सुप्रियो यांनी लगावला.



पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे ममता बॅनर्जी सैरभैर झाल्या आहेत. त्यांचे अनेक मिम्स आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही गोष्ट खचितच चांगली नाही, असेही बाबुल सुप्रियो यांनी सांगितले. 


तत्पूर्वी ममता यांनी जय श्रीराम ही भाजपची घोषणा असल्याचे म्हटले होते. भाजप सर्वांवर ही घोषणा लादण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुका आल्यावर राम भाजपचा एजंट होतो का, असा सवालही ममतांनी विचारला होता.