खराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग
यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.
सुरत : खराब झालेली फळं, भाज्या आपण खाऊ शकत नाही. खराब, कुजलेल्या फळ-भाज्यांमुळे अधिक प्रमाणात दुर्गंधी पसरते. काही ठिकाणी यापासून कम्पोस्ट तयार केलं जातं. परंतु सुरतमधील एपीएमसी मार्केटने खराब झालेल्या फळं-भाज्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी जबरदस्त पर्याय काढला आहे. सुरत एपीएमसी (APMC)खराब फळ-भाज्यांपासून गॅस तयार करुन, त्या गॅसचा गुजरात गॅस कंपनीला (Gujarat Gas Limited) पुरवठा करुन महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
सुरत एपीएमसीच्या या पुढाकाराने, एकीकडे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, एकाचवेळी उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goel) यांनीदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुरतमधील एपीएमसीचा हा प्रयोग शेअर केला आहे.
सुरत एपीएमसी, गुजरात गॅसला दररोज 5100scm बायो गॅसची विक्री करत आहे. गॅस उत्पादनासाठी सुरत एपीएमसी आणि गुजरात गॅस कंपनी यांच्यात करार झाला आहे. या करारानुसार, आंतरराष्ट्रीय किंमतींनुसार गॅस विक्री केली जाते.
सुरत APMCचे अध्यक्ष रमण जानी यांनी सांगितलं की, गॅस प्लांटमध्ये दररोज 50 टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असते. सध्या दररोज सुमारे 25 टन कचर्यावर प्रक्रिया केली जात आहे आणि दररोज 1000 क्यूबिक गॅस तयार होत आहे. गॅस खरेदीसाठी गुजरात गॅस कंपनीबरोबर करार केला आहे. बायोगॅस बनविण्याची मोहीम स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरु केली गेली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बायोगॅस प्लांटचे (Biogas Plant) सुपरवायझर निलेश थोरात यांनी सांगितलं की, या प्लांटमध्ये बायोगॅस शुद्ध करुन सीएनजी बनविला जातो. दरम्यान, सुरत एपीएमसीच्या धर्तीवर गुजरातच्या अन्य बाजारांमध्येही अशी बायोगॅस संयंत्रं उभारण्याची तयारी सुरु आहे.