नवी दिल्ली : दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात नऊ तासांपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन शस्त्रक्रियेनंतर १८ वर्षीय तरूणाच्या पायाच्या वरच्या भागातून तब्बल ३७ सेंटीमीटर लांब ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. हा ट्यूमर काढल्यानंतर तरुणाला नवीन आयुष्यचं मिळालंय. डॉक्टरांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. हा ट्यूमर पायातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्यूमर असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. १८ वर्षीय प्रवीण कुमार गुप्ता याला २६ डिसेंबर २०१८ रोजी गंगाराम रुग्णालयातील ऑर्थोपेडिक्स विभागात दाखल करण्यात आले होते. या रूग्णालयात दाखल होण्याआधी प्रवीण कुमारने अनेक रूग्णालयात तपासणी केली होती. परंतु सर्वच रूग्णालयात त्याला पाय कापावा लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूग्णालयातील एका प्रवक्ताने सांगितले की, तरूणाच्या मांडीच्या भागातून ३७ सेमी लांब, १८ सेमी रूंद आणि १२ सेमी जाडीचा ट्यूमर काढण्यात आला. या ट्युमरमुळे तरुणाच्या संपूर्ण पायाचा मागचा आणि पुढचा भाग निकामी झाला होता. डॉक्टरांकडून या ट्युमरवर शस्त्रक्रिया करून तो शरीराच्या वेगळा करण्यात आला. यामुळे, तरुणाला आपल्या पायाला मुकावं लागलं नाही. ट्युमर काढण्यासाठी एक बाटली रक्ताची गरज लागली असून तब्बल नऊ तासांनंतर त्याच्या पायातील ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. 


२०१२ सालापासून प्रवीण ट्युमरने ग्रासलेला होता. २०१२ पासून ट्युमरच्या जागेवर सूज येत होती आणि त्यासोबतच ट्यूमर वाढत होता. या शस्त्रक्रियेसाठी ऑर्थोपेडिक्स, वॅस्कुलर सर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि एनेस्थिसियोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु या ट्यूमरच्या शस्त्रक्रियेनंतर प्रवीणला नवजीवन मिळालं आहे.