`सरोगसी प्रतिबंधक` विधेयकाला लोकसभेत मंजुरी, पाहा काय सांगतोय नवा कायदा...
पाहा, `सरोगरी`साठी परवानगी कुणाला?
नवी दिल्ली : सरोगसी प्रतिबंधक विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळाल्यामुळं आता व्यावसायिक सरोगसीला लवकरच चाप लागणार आहे. गेल्या काही दिवसांत भारत हा सरोगसीचा अड्डा बनलाय. अनेक परदेशी नागरिक सरोगसीच्या माध्यमातून अपत्य प्राप्तीसाठी भारतात येत आहेत. हे प्रकार नव्या कायद्यामुळं बंद होणार आहेत. विधेयकात या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय तसंच राज्य स्तरावर बोर्ड स्थापन करण्याचाही उल्लेख आहे. महिलांचं शोषण थांबवण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणण्यात आलंय.
'सरोगरी'साठी परवानगी कुणाला?
- मूल न होणाऱ्या जोडप्यांनाच आता सरोगसीच्या मार्गानं अपत्यप्राप्ती करता येईल
- तसंच जोडप्याच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली असायला हवी
- जोडप्यापैंकी एकाला मूल जन्माला घालण्यात असमर्थ असल्याचं सिद्ध करावं लागेल
- विधेयकानुसार, सरोगसीचा लाभ घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती भारतीय असायला हवी
- त्यासाठीची 'सरोगेट मदर' ही त्या दाम्पत्याच्या जवळच्या नात्यातलीच असणं बंधनकारक करण्यात आलंय
- या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर सिंगल पॅरेंट, समलैंगिक आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना इतरांचं गर्भाशय भाड्यानं मिळणार नाही
बॉलिवूडमध्येही सरोगसी पद्धतीनं अनेकांनी मुलांना जन्म दिलेला आहे. अभिनेता शाहरुख खान-गौरी खान, आमिर खान-किरण राव, सनी लिओनी - डॅनियल वेबर, अभिनेता तुषार कपूर, दिग्दर्शक करण जोहर यांनी मुलांना सरोगसी पद्धतीनं जन्म दिलाय. करण आणि तुषार सिंगल पॅरेन्ट म्हणून मुलांचं संगोपन करत आहेत.