सुषमा स्वराजांनी घेतलेली गीताच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी
सगळ्यांचीच भेदभाव न करता मदत करणाऱ्या नेत्या...
नवी दिल्ली : ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांनी सामान्य जनतेवर छाप सोडली त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी देशातल्या जनतेशी शेवटचा संवादही साधला. निधनाच्या तीन तास अगोदर सुषमा स्वराज यांनी काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्याच्या निर्णयाबाबत ट्विट केलं होतं. मी याच दिवसाची प्रतीक्षा करत होते असं सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करताना ट्विटमध्ये म्हटलं होतं. हा सुषमाजींचा शेवटचा संदेश असेल असं कुणाच्याही मनात नसेल.
हसतमुख आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सुषमा स्वराज यांच्याकडं कुणीही मदत मागूदेत. त्या मदत मागणाऱ्याची दखल घ्यायच्या त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करायच्या... देशातला कोणी संकटात असो की परदेशातला... सुषमा स्वराज यांनी शेकडो वेळा अशा अडचणीतल्या लोकांसाठी संबंधित यंत्रणांचा पाठपुरावा केला.
इराकमध्ये अडकलेल्या भारतीय नर्सेसना मायदेशी आणण्यापासून आखाती देशात फसवणूक झालेल्या मजुरांपर्यंत सगळ्यांचीच भेदभाव न करता मदत केली.
पाकिस्तानात फसवणूक झालेल्या उज्माच्या घरवापसीपासून मूकबधीर गीताला भारतात आणण्यामध्ये सुषमा यांनी महत्वाची भूमिका निभावली. खूप कमी लोकांना माहिती असेल की पाकिस्तानातून आलेल्या गीताच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी सुषमा स्वराज यांनी उचलली होती.