वडोदरा : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका करताना 'आरएसएसमध्ये एखाद्या मुलीला शॉर्टस परिधान करताना पाहिलंय का?' या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या एका कार्यक्रमात एका तरुणीनं सुषमा स्वराज यांना राहुल यांच्या या वक्तव्यावरून प्रश्न विचारला. 'राहुल गांधींनी आरएसएसमध्ये एखाद्या महिलेला शॉर्टस परिधान केलेलं पाहिलंय का? असा प्रश्न विचारला होता... माझ्या मते नेत्यांना अशा भाषेत बोलणं त्यांना शोभा देत नाही, यावर तुम्ही काय म्हणाल?' असा प्रश्न या तरुणीनं विचारला.



त्यावर 'माझं विषयावर तेच म्हणणं आहे जे तुम्ही म्हटलंय. नेत्यांना या पद्धतीची भाषा शोभा देत नाही. राहुलजी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आहेत... त्यांच्या लवकरच अध्यक्ष बनण्याच्या चर्चा सुरू आहेत. जर त्यांनी आम्हाला विचारलं असतं की आरएसएसमध्ये महिलांना परवानगी का नाही? तर मी त्यांना उत्तर दिलं असतं आणि तर्कसंगत उत्तर दिलं असतं... परंतु, ज्या अनुचित आणि अभद्र भाषेत त्यांनी हा प्रश्न विचारला, मला वाटतं की हा प्रश्न उत्तर देण्याच्याही पात्रतेचा नाही... यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही' असं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.


काय म्हटलं होतं राहुल गांधींनी...


राहुल गांधींनी आपल्या गुजरात दौऱ्यात संघावर जोरदार हल्ला करत महिला सक्षमीकरणाच्या बढाया मारणाऱ्या संघात महिलांना मात्र प्रवेश नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. 'संघात किती महिला आहेत? तुम्ही कधी महिलांना संघाच्या शाखेत पाहिलंय शॉर्टसमध्ये? मी तर नाही पाहिल्यात... आरएसएसमध्ये तुम्हाला एक महिला दिसत नाही... माहीत नाही काय चूक केलीय महिलांनी की त्या संघात प्रवेश करू शकत नाहीत' असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.