नवी दिल्ली : 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्ये प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण, बुखारी यांच्या हत्येत लश्करचा फरार दहशतवादी नवीद जट याचा हात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांकडून सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, बुखारी यांची हत्या करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी एक नवीद जट असण्याची दाट शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायझिंग काश्मीर या इंग्रजी दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तीन जणांनी अत्यंत जवळून गोळ्या झाडून बुखारींना ठार मारलं. हे तिघे आरोपी बाईकवरुन जात असतानाचा फोटोही पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. बाईकवर बसलेल्या तिघांपैकी मध्ये जो व्यक्ती बसला आहे तो जट असल्याचा अंदाज आहे.



दहशतवादी नवीद जट हा फेब्रुवारी २०१८ रोजी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. त्यानंतर तो पुलवामा परिसरात लपला असल्याची माहिती समोर आली होती.


५ जणांना पोलिसांनी केली होती अटक 


फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिसांच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यानंतर जट फरार झाला. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी मारले गेले होते. जट फरार झाल्याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. या आरोपींमध्ये शकील अहमद भट, टीका खान, सय्यद ताजमुल इस्लाम, मोहम्मद शफी वानी आणि जान मोहम्मद गनई यांचा समावेश आहे.


कोण आहे मोहम्मद नवीद जट उर्फ अबु हनाजला?


नवीद जट हा ऑक्टोबर २०१२ मध्ये ६ दहशतवाद्यांसोबत उत्तर काश्मीरमधील केरान सेक्टरमधून काश्मीरमध्ये आला होता. सेवानिवृत्त सेना चालकाचा मुलगा असलेला नवीद जट याने जमाद-उद-दावाच्या विविध मदरशांत प्रशिक्षण घेतलं. काश्मीरमध्ये अटक झाल्यानंतर त्याने आपलं वय १७ वर्ष असल्याचं सांगितलं. मात्र, चौकशी झाल्यानंतर त्याचं वय २२ वर्ष असल्याचं समोर आलं होतं.