Crime News : तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करणं एका जोडप्याला चांगले महागात पडलं आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पती आणि पत्नीची निर्घृणपणे हत्या (Tamil Nadu Crime) करण्यात आली आहे. घरातून पळून जाणून दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांचीही हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Tamil Nadu Police) घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. ही हत्या कुटुंबीयांनी केली की अन्य कोणी हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूच्या थुथूकुडी भागात हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. थुथुकुडीच्या मुरुगेसन येथे राहणारा 24 वर्षीय मारी सेल्वम आणि 20 वर्षीय कार्तिका गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून गेले आणि 30 ऑक्टोबरला लग्न करून मुरुगेसन नगरमध्ये एकत्र राहू लागले. दोघेही एकाच समाजाचे होते. तरीही कार्तिकाच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. अशातच लग्नानंतर अवघ्या तीन दिवसांताच त्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पाच जणांची टोळी अचानक त्यांच्या घरात घुसली. त्यांनी नवदाम्पत्याची निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घरामध्ये सेल्वम आणि कार्तिका दोघांचेही मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी थुथुकुडी शासकीय रुग्णालयात पाठवले.


एका शिपिंग कंपनीत काम करणारा 24 वर्षीय मारिसेल्वम आणि त्याची पत्नी कार्तिका यांचे 30 ऑक्टोबर रोजी स्थानिक मंदिरात लग्न झाले होते. आपण दोघेही लग्न करण्याआधी त्यांनी स्थानिक महिला पोलीस ठाण्यातही संपर्क साधला होता. दरम्यान, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कार्तिकाला दोन बहिणी आहेत. हा खून त्यांच्याच नातेवाईकाने केला असावा, असे सूत्रांनी सांगितले, मात्र या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.