तामिळनाडु : तामिळनाडुतल्या कुन्नूरमध्ये भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस (CSD) बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, एक ब्रिग्रेडिअर रँकचे अधिकारी, दोन पायलट यांच्यासहीत १४ जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला  Mi-17V5 ते वायुसेनेचं अति सुरक्षित हेलिकॉप्टर समजलं जातं. या हेलिकॉप्टरचा वापर व्हीव्हीआयपी उड्डाणासाठीही केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज
वायु सेनेचं हे  MI17 V5 हेलिकॉप्टर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या हेलिकॉप्टरचा लष्कराच्या अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्सचमध्ये सहभाग आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती रशियात केली जाते.  या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने सैन्य आणि शस्त्रास्त्र वाहतुकीसाठी केला जातो.  याशिवाय शोध मोहिम, गस्त घालणं, मदत आणि बचाव कार्यातही या हेलिकॉप्टरची मदत होते.


कठिण परिस्थितीतही उड्डाण
या हेलिकॉप्टरचा कमाल वेग 250 किमी प्रतितास आहे. तर 6000 मीटर उंचीपर्यंत पर्वतीय आणि दुर्गम भागातही हे हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास सक्षम असल्याचं मानलं जातं. एकदा इंधन भरल्यानंतर MI-17V5 तब्बल 580 किमी अंतर कापू शकतं. अत्यंत कठीण परिस्थितीतही हे हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास सक्षम आहे.


महत्त्वाच्या कारवायांमध्ये सहभाग
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी एनएसजी कमांडो या हेलिकॉप्टरच्या मदतीने कुलाब्यात उतरले होते. अहवालानुसार, सप्टेंबर २०१६ मध्ये याच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्जिकल स्ट्राईकमध्ये जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लाँच पॅड नष्ट करण्यात आलं होतं.


भारताकडे १५० हून अधिक Mi-17V5
व्हीव्हीआयपी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या Mi-8 हेलिकॉप्टर्सच्या सेवा समाप्तीनंतर या कामासाठी 12 इटालियन ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर बदलण्याची यापूर्वी योजना होती. परंतु लाचखोरीच्या आरोपांमुळे ही योजना रखडली होती. नंतर भारतीय हवाई दलाने पर्यायी म्हणून Mi-17V5 निवडले. भारताकडे सध्या 150 हून अधिक Mi-17 V5 हेलिकॉप्टर आहेत. शेवटचे हेलिकॉप्टर रशियाहून जानेवारी २०१६ मध्ये आलं होतं.


डिसेंबरमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित होते
या वर्षी ऑक्टोबरमध्ये व्हीव्हीआयपी मुव्हमेटसाठी वापरल्या जाणार्‍या पाच रशियन Mi-17V5 हेलिकॉप्टरमध्ये आणखी सुधारणा करणं अपेक्षित होतं. यामध्ये केबिनचे नूतनीकरण, फर्निशिंग, वातानुकूलित आणि प्रवासी आसनांचे फिटिंग, आवश्यक सुरक्षा, दळणवळण आणि सुरक्षा उपकरणे यांचे रेट्रोफिटिंग, एक लहान शौचालय बांधण्याव्यतिरिक्त समाविष्ट आहे. डेकच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणे अपेक्षित होतं आणि एका वेळी एकच हेलिकॉप्टरचं काम केलं जाणार होतं. पाच हेलिकॉप्टरचे काम पूर्ण होण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. त्यासाठी काही सामान परदेशातून आयात करण्यात येणार होतं.