Tanker Rolls Royce Collide Head On: हरियाणामध्ये झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रोल्स-रॉयल्स या आलिशान गाडीचा आणि डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत टँकरचा चालक आणि त्याचा सहकारी मृत्यूमुखी पडले आहेत. तर रोल्स-रॉयल्स कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात दिल्ली-मुंबई-बडोदा एक्सप्रेस वेवर झाल्याची माहिती हरियाणामधील नूह पोलिसांनी दिली आहे. 


स्थानिकांनी घेतली घटनास्थळी धाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला. डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरने समोरुन येणाऱ्या रोल्स-रॉयल्स कारला जोरदार धडक दिली. रस्त्याच्या विरुद्ध बाजूने अत्यंत वेगाने चालक टँकर चालवत होता. त्याचवेळी समोर आलेल्या रोल्स-रॉयल्सचा या टँकरने जोरदार धडक दिली. नागिना पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या उमरी गावाच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दोन वाहानांच्या धडकेमध्ये तुलनेनं अधिक वजनदार असलेल्या टँकरमधील दोघांचा मृत्यू झाला असून कारमधील सर्वजण सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 


कारमधील पाचही जण वाचले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरने समोरुन धडक दिल्यानंतर रोल्स-रॉयल्स कंपनीच्या लिमोझीन कारने क्षणात पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखून कारमधून प्रवास करणाऱ्यांना सर्वांना वेळीच बाहेर काढण्यात आलं. अपघातग्रस्त कारच्या मागून त्यांच्याच कुटुंबियांची कार येत असल्याने त्यांनी या अपघातानंतर रोल्स-रॉयल्समधील प्रवाशांना बाहेर काढलं. कारने पूर्ण पेट घेण्याआधीच सर्वांना बाहेर काढण्यात यश आल्याने रोल्स-रॉयल्समधल्या सर्वांचे प्राण वाचले. या कारमधून एकूण 5 जण प्रवास करत होते.


टँकरमधील दोघांचा मृत्यू


मात्र डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांची ओखळ रामप्रीत आणि कुलदीप असं आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या रोल्स-रॉयल्समधील प्रवाशांची नावं दिव्या, तस्बीर आणि विकास अशी आहेत. यापैकी दिव्या आणि तस्बीर मूळचे चंदीगढचे असून विकास दिल्लीचा आहे. सर्व जखणींवर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.


एफआयआर दाखल


पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करुन घेण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणामध्ये जखमी व्यक्तींचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना अपघातासंदर्भातील माहिती देण्यात आल्याचंही अशोक कुमार यांनी सांगितलं.