85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Tata - Haldiram Deal: टाटा समूहाची (TaTa Group) एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) लवकरच मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता यावर टाटाने स्पष्टीकरण दिले आहे.
Tata Consumer - Haldiram Deal: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) नागपूरची प्रसिद्ध कंपनी व जगभरात फेमस असलेल्या हल्दिराममध्ये (Haldiram) 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रॉयटर्नने दिलेल्या वृत्तानुसार, टाटाने हल्दीराममध्ये स्टेक खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र आता टाटा समूहानं (TaTa Group)यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर टाटाचे शेअर्सही वधारले होते. रिपोर्टनुसार, हल्दीरामचं मुल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या सगळ्या चर्चांवर टाटाने मौन सोडलं आहे. टाटाने या वृत्ताचे खंडन केले असून हल्दीराम कंपनीच्या खरेदीबाबत कोणत्याही चर्चा सुरू नाहीयेत, असं कंपनीने स्पष्ट केले आहे.
टाटा कंझ्युमरच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा कंझ्युमर बाजारात सुरू असलेल्या कोणत्याची चर्चांवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असं प्रवक्तांकडून सांगण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे हल्दीरामनंही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
85 वर्षांपासून व्यवसायात
जवळपास 85 वर्षांपासून हल्दीराम बाजारात पाय रोवून उभा आहे. 1937मध्ये हल्दीरामची सुरूवात झाली होती. नमकीन भुजिया ते मिठाईपर्यंत हल्दीरामच्या वस्तू घराघरांत पोहोचल्या आहेत. हल्दीरामचे देशभरात 150 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत. यात मिठाईसह अनेक प्रकारच्या थाळीदेखील उपलब्ध आहेत. देशातील फरसण व व स्नॅक्सच्या बाजारपेठेतील 13 टक्के मार्केट हल्दीरामने काबीज केले आहे. हल्दीराम सिंगापूर आणि अमेरिकासारख्या देशातही उपलब्ध आहे. हल्दीराम ब्रँड हा कौटुंबिक व्यवसाय आहे. नागपूरस्थित हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल हा मोठा भाऊ शिव किशन अग्रवाल चालवतात, तर दिल्लीस्थित हल्दीराम स्नॅक्स हे धाकटे भाऊ मनोहर आणि मधुसूदन अग्रवाल चालवतात.
देशात 150 रेस्टॉरंट्स
एका अहवालानुसार, भारतातील स्नॅक्स मार्केट सुमारे 6.2 अब्ज डॉलर्सचे आहे आणि यात हल्दीरामचे या मार्केमध्ये 13 टक्के वाटा आहे. या व्यतिरिक्त पेप्सी आणि लेज चिप्सचाही मार्केटमध्ये 12 टक्के वाटा आहे. फक्त भारतातच नाही तर सिंगापूर, युएसएसारख्या परदेशी बाजारपेठेत हल्दीरामला मोठा मागणी आहे.
दरम्यान, टाटाकडून ही डील झाली असती तर पेप्सी, बीकानेर आणि रिलायन्स रिटेलसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यास मदत मिळाली असती.