TCSच्या सीईओंच्या पगारात दुप्पटीनं वाढ, पाहा, किती आहे पगार...
फेब्रुवारीमध्ये सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी गोपीनाथन टीसीएसच्या सीएफओपदी (चीफ फायनान्शिअल ऑफिसर) कार्यरत होते.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी असलेल्या टीसीएसनं (Tata Consultancy Services) आपल्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या (सीईओ) पगारात दुप्पटीनं वाढ केलीय. होय, आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी टीसीएसनं राजेश गोपीनाथन यांचं मानधन गेल्या वर्षीपेक्षा दुप्पटीनं वाढवलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कंपनीत सर्वोच्च पद सांभाळण्यासाठी गोपीनाथन यांच्या पगारात ही भरघोस वाढ करण्यात आलीय. गोपीनाथन यांनी जेव्हा टीसीएसच्या सीईओपदाचा कार्यभार सांभाळला तेव्हा त्यांना वार्षिक ६.२ करोड रुपये पगाराचं पॅकेज मिळालं होतं. आता कंपनीकडून त्यांचं वार्षिक पॅकेजमध्ये वाढ करून हे पॅकेज तब्बल १२ करोडोंचं करण्यात आलंय. फेब्रुवारीमध्ये सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी गोपीनाथन टीसीएसच्या सीएफओपदी (चीफ फायनान्शिअल ऑफिसर) कार्यरत होते.
इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथन यांच्या पगारात १.०२ करोड रुपये कॉम्पॅन्सेशनमध्ये ६० लाख रुपये लाभ, १० करोडोंचं कमिशन आणि ८६.८ लाख अन्य भत्त्यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गोपीनाथन टीसीएससोबत २००१ पासून काम करत आहेत. फेब्रुवारी २०१३ मध्ये कंपनीत सीएफओ पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यांनी यापूर्वी टाटा इंडस्ट्रीजसोबतही काम केलंय.
दरम्यान, टीसीएसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एन जी सुब्रमण्यम यांना गेल्या वर्षी ६.१५ करोड रुपये मिळाले होते. यंदाच्या वर्षात त्यांना ९ करोड रुपयांचा वार्षिक पगार देण्यात येणार आहे. तिमाही परिणाम घोषित झाल्यानंतर कंपनीनं मार्च महिन्यात १२० टक्के व्हेरिएबल पे ऑफर केली होती.