नवी दिल्ली : शाळेतील दोन शिक्षकांना आपल्या लग्नामुळे नोकरी गमवावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यातील एका शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिकेला शाळा प्रशासनाने त्यांच्या लग्नाच्या दिवशीच निलंबित करण्यात आलं आहे.


पहलगाममधील त्राल शहरात राहणारे तारीक भट आणि सुमाया बशीर हे दोघेही पंपोर मुस्लिम एज्युकेशन इंस्टीट्यूटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत.


तारीक आणि सुमाया यांनी आरोप केला आहे की, शाळा प्रशासनाने ३० नोव्हेंबर रोजी त्यांना अचानक निलंबित केलं. याच दिवशी दोघांचं लग्नही होतं.


तारीक भट यांनी सांगितले की, त्यांचं अरेंज मॅरेज होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपूडाही झाला होता. याबाबत शाळा प्रशासनाला माहितीही होती. त्यांनी शाळा प्रशासनावर आरोप केला आहे की, आपली बाजू न ऐकताच निलंबित करण्यात आलं आहे. 


भट यांनी सांगितले की, लग्नासाठी दोघांनीही एका महिन्याच्या सुट्टीसाठी अर्ज केला होता. आमची प्रतिमा खराब केली जात आहे.


शाळा प्रशासनाने दावा केला आहे की, या शिक्षक आणि शिक्षिकेचा रोमान्स शाळेतील विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. 


शाळेच्या मुख्याध्यापकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तर, शाळेचे अध्यक्ष बशीर मसूदी यांनी सांगितले की, दोघेही शिक्षक लग्नापूर्वीच रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या या रोमान्सचा परिणाम शाळेतील २००० विद्यार्थ्यांवर होत होता. तसेच शाळेत काम करणाऱ्या २०० सदस्यांसाठीही हे चांगलं नव्हतं.