हिंदू पत्नीला मिठी मारून तेहसीन पुनावाला म्हणतात.... आता हात तोडून दाखवाच
हे छायाचित्र अनेकांनी रिट्विट करून अनंतकुमार हेगडे यांच्या वृत्तीचा निषेधही केला आहे.
नवी दिल्ली: हिंदू मुलींना स्पर्श करणाऱ्यांचे हात छाटण्याची भाषा करणारे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. हेगडे यांच्या विधानाचा धागा पकडत तेहसीन पुनावाला यांनी ट्विटरवर एक छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये तेहसीन पुनावाला पत्नीसोबत दिसत आहेत. तेहसीन यांची पत्नी हिंदू आहे. तिला मिठी मारतानाचे छायाचित्र ट्विट करून तेहसीन यांनी अनंतकुमार हेगडे यांना डिवचणारा संदेश लिहला आहे. बघा मी माझ्या हिंदू पत्नीला स्पर्श करतोय. आता तुम्ही काय करू शकता ते दाखवा, असे पुनावाला यांनी म्हटले आहे. हे छायाचित्र अनेकांनी रिट्विट करून अनंतकुमार हेगडे यांच्या वृत्तीचा निषेधही केला आहे.
अनंतकुमार हेगडे यांनी रविवारी कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यातील सभेत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्याचा प्रतिवाद करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी हेगडे यांना काही प्रश्न विचारले होते. खासदार किंवा मंत्री म्हणून तुम्ही काय कामगिरी केली आहे? कर्नाटकच्या विकासात तुमचे किती योगदान आहे? अशा लोकांना खासदार किंवा मंत्रीपद देणे ही खूपच निराशादायक गोष्ट आहे, असे दिनेश राव यांनी म्हटले होते. या टीकेला मी दिनेश राव यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. मात्र, त्यांना प्रथम काही गोष्टींचा खुलासा करावा. कारण, माझ्या माहितीनुसार हा व्यक्ती स्वत:च्या मुस्लिम पत्नीच्या इशाऱ्यावर नाचतो, असे हेगडे यांनी म्हटले होते.
या प्रकारानंतर दिनेश राव यांची पत्नी तब्बू राव यांनीही हेगडेंना प्रत्युत्तर दिले. भाजपासाठी मी एक ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहे. माझ्या पतीचा सामना करण्यात त्यांना अपयश येत असल्यामुळे ते मला लक्ष्य करत आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना अनंतकुमार यांनी माझ्यावर चिखलफेक केली. होय मी जन्माने मुस्लिम आहे. पण मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, असे सांगत तब्बू राव यांनी हेगडेंना सणसणीत चपराक लगावली.