Telangana Assembly Election 2023 : तेलंगणात (Telangana) सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तेलंगणात निवडणूक प्रचार सभेला संबोधत असतानाच मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांचा संयम सुटला. संतापलेल्या खरगेंनी भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितलं आहे. खरगे यांनी स्टेजवरुनच कार्यकर्त्यांना फटकारलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी तेलंगणातील कालवकुर्थी येथे एका जाहीर सभेत भाषण करताना बेशिस्त कार्यकर्त्यांना झापलं. 
तेलंगणामध्ये  30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मल्लिकार्जून खरगे काँग्रेसचा प्रचार करत होते. काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीतील आश्वासनांची यादी वाचत असतानाच लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाराज झालेल्या खरगे यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली.


काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?


"शांत बसा, ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर इथून बाहेर जा." असं बोलत बसू नका. तुम्हाला माहीत नाही का?  या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते बोलत आहेत आणि तुम्ही बोलत रहा. ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर जा तुमच्या जागेवर," असे खरगे संतापून म्हणाले. या संधीचा फायदा घेत तेलंगणातील भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा खरगे यांना काँग्रेसचे रबर स्टॅम्प अध्यक्ष म्हटले आहे.



याच सभेत बोलताना खरगे यांनी भाजपावरही निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. "नरेंद्र मोदी निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, 'मी पंतप्रधान झालो तर बाहेरून काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देईन. समजलं का? पंतप्रधान खोटे बोलतात की खरे बोलतात? त्यांनी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार असं सांगितलं होतं.त्या मिळाल्या का? पंतप्रधानांचे हे दुसरं खोटे आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबद्दल खोटे बोलत राहिले. केसीआर यांनीही तेच केले. केसीआर कार्यालयात किंवा विधानसभेत बसत नाहीत. ते त्यांच्या फार्म हाऊसवर बसतात आणि तिथूनच राज्य करतात. अशा सरकारला उखडून टाकावे लागेल," असे खरगे म्हणाले.