Telangana Election 2023 : तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगही आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना दिसत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तेलंगणा पोलिसांनी एका गाडीतून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे जप्त केले की त्यांना ते नेण्यासाठी ट्रॉलीचा वापर करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याचदरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान तेलंगणा पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या रोख रकमेबाबत कार चालकाकडे चौकशी केली असता ते या रोख रकमेचा कोणतीही  देऊ शकले नाहीत. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना वाहनांच्या तपासणीदरम्यान, एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून बघितल्यावर पोलिसांना धक्काच बसला. सुटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्यात आली होती. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून तिघांनाही ताब्यात घेतले आणि रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द केली.


तेलंगणा राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या वाहन चेकपोस्टवर ही घटना घडली. चिरेक इंटरनॅशनल स्कूलजवळील मस्जिद बांदा रोडवरील बोटॅनिकल गार्डन येथे पोलिसांनी मारुती ब्रेझा कार अडवली होती. त्यावेळी तपासणी केली असता त्यांना कारमध्ये असलेल्या दोन सुटकेसमध्ये 5 कोटी रुपये रोख सापडले. पोलिसांनी याप्रकरणी तीनजणांना अटक केली. दुग्याला संतोष राव, मुत्याला नरेश आणि चीती संपत राव अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिघेही व्यावसायिक आहेत. तिघेही योग्य कागदपत्रांशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेची वाहतूक करत होते.


त्याआधी रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या हयात नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. पेड्डा अंबरपेठजवळ एका कारमध्ये रोकडच्या पाच बॅगा सापडल्या होत्या. ही रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.


दरम्यान, तेलंगणामध्ये मतदारांना आपल्याबाजूने करण्यासाठी रोख रक्कम, दारू किंवा इतर वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि इतर अंमलबजावणी संस्थांनी राज्यभर तपासण्या सुरु केल्या आहेत. 9 ऑक्टोबरपासून, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून तपास संस्थांनी रोख, मौल्यवान वस्तू, दारू, ड्रग्ज आणि 657 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत.