२०१९: काँग्रेस-भाजपला टक्कर देणार तिसरी आघाडी, मोर्चेबांधणी सुरू
देशाच्या राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांना पर्याय देणारे सरकार स्थापण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
नवी दिल्ली: देशाच्या तख्तावर कोण राज्य करेल ? या प्रश्नाकडे उत्तरादाखल म्हणून नेहमीच काँग्रेस किंवा भाजप या राजकीय पक्षाकडे पाहिले जाते. अपवाद वगळता आजवरचा इतिहास पाहता ते वास्तवही आहे. पण, यापुढे देशाच्या राष्ट्रीय राजकारणात भाजप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांना पर्याय देणारे सरकार स्थापण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ही मोर्चेबांधणी यशस्वी झाली तर, २०१९ मध्ये भाजप आणि काँग्रेसला टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी कार्यन्वित झालेली पहायला मिळेल.
तिसरी आघाडी आकार घेत आहे...
दरम्यान, पुढच्या वर्षी (२०१९) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएला टक्कर देण्यासाठी काँग्रेस जोरदार हालचाली करत आहे. मात्र, देशाच्या राजकारणात एक वेगळाच अवकाष आकार घेताना दिसत आहे. हा अवकाष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हालचालींच्या रूपात दिसू लागला आहे. ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव यांच्यात नुकतीच चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेनंतर देशात बिगर भाजप बिगर काँग्रेसी फेडरल आकार घेत असल्याचे के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव यांच्यात चर्चा
कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि तेलगणा राष्ट्र समिती (टआरएस) चे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्यात सोमवारी झालेली चर्चा राजकीय दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाची आहे. या चर्चेनंतर ममता बॅनर्जी यांनी ही एक चांगली सुरूवात असल्याचे म्हटले आहे. ममता म्हणाल्या, मला वाटते राजकारण ही एक सातत्यपूर्णतेने चालणारी गोष्ट आहे. आमच्यात जी चर्चा झाली त्यात देशाचा विकास हा प्रमुख मुद्दा होता.
काँग्रेस, भाजपला पर्याय देणारी आघाडी
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी असेही म्हटले की, राजकारण हा एक असा घटक आहे. जो तुम्हाला वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायला लावतो. मी राजकारणात विश्वास ठेवते. राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला एक मजबूत दावेदार म्हणून सादर करणारे के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले की, काँग्रेस, भाजपला पर्याय देणारे नेतृत्व एक सामूहिक आणि संघीय नेतृत्व असेन. ज्यात सर्व लोक सोबत असतील.