कालावधी संपण्याआधीच तेलंगणाचं राज्य सरकार बरखास्त
राज्यात याच वर्षी निवडणूक होण्याची शक्यता
हैदराबाद : विधानसभेचा कालावधी संपण्याआधीच राज्य सरकार बरखास्त करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेलंगणाचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची सिफारिश करण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यपाल ईएसएल नरसिम्हन यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यपाल ईएसएल नरसिम्हन यांनी त्यांना प्रभारी मुख्यमंत्री राहण्याचा प्रस्ताव दिला आहे. राज्यात याच वर्षी निवडणुका होऊ शकतात.
तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपतो आहे. वेळेच्या आधी विधानसभा निवडणूक घेण्यासाठी मंत्रिमंडळ बरखास्त करण्यासाठी 5 दिवसात दोनदा बैठक झाली. 6 सप्टेंबरला विधानसभा बरखास्त केली गेली.
6 सप्टेंबरला का केलं बरखास्त ?
विधानसभा बरखास्त करण्यासाठी 6 सप्टेंबरची तारीख निवडण्यात आली. यामागे एक कारण आहे. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री राव यांचा 6 हा लकी नंबर आहे. राव यांचं म्हणणं आहे की, ही तारीख त्यांच्या खास आणि लाभदायक आहे.
लोकसभेसह होणार होती विधानसभा निवडणूक
तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीसोबत घेण्यात येणार होती. पण दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या वर्षी झाल्या तर त्यांच्या पक्षाला मोठा फायदा होईल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. मे 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने 119 पैकी 63 जागा जिंकल्या होत्या.