Telangana Crime : सरकारी अधिकाऱ्याने 7 कोटींसाठी रचला स्वतःच्या हत्येचा बनाव; धक्कादायक घटनाक्रम पाहून पोलिसही चक्रावले
Telanagana Crime : सरकारी अधिकाऱ्याने 7 कोटी रुपये मिळवण्यासाठी तब्बल वर्षभरापासून प्लॅनिंग केली होती. योजनेप्रमाणे सर्व सुरळीत पार पडलं मात्र एका चुकीमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि या धक्कादायक प्रकरणाचा उलघडा झाला
Telanagana Crime : पैशांसाठी कोणी कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. हैद्राबादमधील (hyderabad) एका सरकारी अधिकाऱ्याने पैशांसाठी एका निर्दोष व्यक्तीची हत्या करत स्वतःच्या हत्येचा बनाव रचला. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येनंतर आरोपीने हा अपघात असल्याचे दाखवत विम्याचे (life insurance) पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी या प्रकणात चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सुरुवातीला सरकारी अधिकाऱ्याचाच मृत्यू झालाय यावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र अधिक तपासानंतर अनेक खुलासे झाले आहेत.
कशासाठी रचला बनाव?
शेअर बाजारात 85 लाखांचे नुकसान झाल्याने सरकारी अधिकाऱ्याने त्याची पत्नी आणि नातेवाईकांसह एक योजना बनवली होती. नुकसान भरून काढण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी धर्मराजने एका व्यक्तीचा कथितपणे खून केला आणि विम्याच्या रकमेवर दावा करण्यासाठी स्वतःचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेलंगणा सरकारच्या या अधिकाऱ्याने 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचे खोटे नाटक केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी आणि दोन नातेवाईकांसह चार जणांना मेडक जिल्ह्यात अटक करण्यात आली. पीटीआयच्या वृत्तानुसार मुख्य आरोपी तेलंगणा राज्य सचिवालयात असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) म्हणून काम करत होता. धर्मनायक असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याने आपल्या साथीदारांसह महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील बाबू मारुती गलागाये (42) या व्यक्तीची हत्या केली.
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी धर्मराजने त्याच्यासारखी शरीरयष्टी असलेल्या बाबू यांची हत्या करून गाडीसह मृतदेह जाळला होता. बाबू हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोकर तालुक्यातील एका गावचे रहिवासी आहेत. या प्रकरणातील आरोपी धर्मनायक आणि त्याचा पुतण्या तेजवत श्रीनिवास यांनी गेल्या आठवड्यात निजामाबाद रेल्वे स्थानकावरील बाबू याला मेडक जिल्ह्यातील टेकमल मंडल येथील व्यंकटपूर तलाव येथे कारमध्ये नेऊन त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
कशी केली हत्या?
8 जानेवारी रोजी धर्मराजने पुतण्यासह निजामाबाद रेल्वे स्थानकाजवळ बाबू यांना सोबत येण्यास सांगितले. दोघांनी बाबूचे मुंडन केले आणि त्याला धर्मराजचे कपडे घातले. यानंतर त्यांनी बाबू यांना व्यंकटपूर गावात नेले. यानंतर धर्मराजने कारच्या आत आणि बाहेर पेट्रोल ओतले आणि बाबू यांना पुढे बसण्यास सांगितले. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा त्यांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने आणि लाठीने हल्ला केला आणि त्याला ठार मारले, नंतर त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि नंतर गाडी पेटवून दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराजने गेल्या एका वर्षात स्वतःच्या नावावर 7.4 कोटी रुपयांच्या 25 विमा पॉलिसी काढल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एक जळालेली कार सापडली होती, त्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी हा मृतदेह तेलंगणा राज्य सचिवालयातील सहाय्यक विभाग अधिकारी धर्मराज याचा असल्याचे गृहीत धरले होते. पण धर्मराज जिवंत सापडल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले.
कसा झाला खुनाचा उलघडा?
9 जानेवारी रोजी जिल्ह्यातील जळालेल्या मृतदेहासह एक पूर्णपणे जळालेली कार सापडली होती. या कारजवळ पेट्रोलची अर्धी भरलेली बाटली आणि बॅग आढळून आली. कारचा नोंदणी क्रमांक आणि बॅगेत सापडलेल्या ओळखपत्राच्या आधारे धर्मराज याची ओळख पटली. सुरुवातीला पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान धर्मराजचा मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे पोलीस थेट गोव्यात पोहोचले आणि त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी धर्मराजला गोव्यातून जिवंत ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशीनंतर इतर आरोपींनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या चौकशीनंतर बाबू यांची हत्या झाल्याची माहिती पुढे आली. बाबू यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. बाबू महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बोकर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना दिसला आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात त्याबाबत चौकशी केली. यावेळी बाबूच्या नातेवाईकांनी सांगितले के ते मजूरीच्या कामासाठी निजामाबाद येथे गेले होते.