हैदराबाद : हैदराबादमध्ये (Hyderabad) एका तरुण महिला पशु चिकित्सक महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण घडल्यानंतर आठवठ्यातच पोलिसांनी शादनगरजवळ एका चकमकीत चारही आरोपींचं एन्काउंटर केलंय. पोलिसांचं या कामगिरीचं बहुतेकांनी कौतुक केलं असलं तरी या चकमकीवर मानवाधिकार कार्यकर्त्यांसहीत काही जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळेच देशभर चर्चिल्या जाणाऱ्या या चकमकीबद्दल माहिती देताना सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार एका पत्रकार परिषदेला सामोरे गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर आरोपींविरोधात वैज्ञानिकदृष्ट्या पुरावेही गोळा करण्यात आले. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत धाडल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली, असं सज्जनार यांनी म्हटलंय. 


आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेवर अत्याचार करतानाच आरोपींनी तिचा मोबाईल आणि इतर सामान लपवून ठेवलं होतं. तेच परत मिळवण्यासाठी आरोपींना पुन्हा एकदा घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी, १० पोलीस आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले तर उरलेले गाडीतच बसलेले होते. त्यावेळी, आरोपींनी दगड आणि काठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. 


मोहम्मद आरिफ (२६ वर्ष) आणि चिंताकुंटा चेन्नाकेशवुलु (२० वर्ष) या दोन आरोपींनी पोलिसांचीच हत्यारं त्यांच्याकडून खेचून घेतली आणि पोलीस टीमवर हल्ला केला. आरिफकडून सर्वात अगोदर हल्ला करण्यात आला त्यानंतर चिंताकुंटा चेन्नाकेशवुलु यानंही पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 



पोलिसांनी आरोपींना सरेंडर करायला सांगितलं. त्यानंतरही त्यांनी हत्यारं टाकली नाहीत आणि पोलिसांना आत्मसंरक्षणासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. चारही आरोपी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले. 
आरिफकडून पोलिसांनी हत्यार जप्त केलं. ही संपूर्ण घटना पहाटे ५.४५ ते ६.१५ दरम्यान घडली. पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित-मृत तरुणीसोबत आरोपींचीही डीएनए चाचणी करण्यात आली होती.


सज्जनार यांनी मीडियाला पोलिसांवर कोणतेही आरोप न करण्याचीही विनंती केली. आज झालेल्या चकमकीत एस आय व्यंकटेश्वर आणि आणखीन एक कॉन्स्टेबल गोळी लागल्यानं जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. दोन्ही जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेची नोंद आर्म्स ऍक्टनुसार केली जाणार आहे.