मोठी बातमी । देशाची चिंता वाढतेय, एका दिवसात १० हजार कोरोनाचे नवे रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. काही ठिकाणी कोरोना वाढीच्या वेगावल नियंत्रण आणण्यात यश आले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. काही ठिकाणी कोरोना वाढीच्या वेगावल नियंत्रण आणण्यात यश आले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा वाढीचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारांहून अधिक नोंदवला गेला. गेल्या चोवीस तासांमध्ये जवळपास १० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. देशातील रुग्णांचा आकडा २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचला आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार ४६२ रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभरात ९,८५१ तर, बुधवारी ९,३०४ रुग्णांची भर पडली. ३१ मेपासून ३ जूनपर्यंत कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रतिदिन ८ हजारांहून अधिक वाढ झाली होती. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये तामीळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १३०० नव्या रुग्णांची भर पडली आहे. २५ हजार रुग्णसंख्या असलेले महाराष्ट्र (७७ हजार ७९३) आणि तमिळनाडूनंतर (२७ हजार २५६) दिल्ली (२५ हजार ४) हे तिसरे राज्य ठरले आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून देशभरात एकूण रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार ६६२ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५,३५५ रुग्ण बरे झाले. एकूण मृत्यू ६,३४८ झालेत. तर गेल्या २४तासांमध्ये २७३ मृत्यू झाले आहेत.