जम्मू कश्मीर: कुलगाममध्ये पोलिसांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करत हल्ला केला
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करत हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्लयात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
न्यूज एजन्सी ANI च्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी नंदमार्गजवळ पोलिसांच्या गाडीवर अचानक हल्ला केला. पोलिसांच्या गाडीत बसलेले पोलीस कर्मचाऱ्यांना काही कळण्याआधीच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.ॉ
दहशतवाद्यांकडून सुरु असलेल्या गोळीबाराला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. तसेच घटनास्थळी सुरक्षादलालाही पाठवण्यात आलं. दरम्यान, सध्या घटनास्थळाच्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलातर्फे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
बांदीपुरात दोन जवान शहीद
११ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपूरा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वायुसेनेचे दोन जवान शहीद झाले. भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांदीपुरा येथील हाजिन परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच या चकमकी दरम्यान दोन वायुसेनेचे जवान जखमी झाले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं.
बांदीपूरा जिल्ह्यातील हाजिन येथे बुधवारी सकाळी भारतीय सैन्याला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सैन्य दलातर्फे जवळपासच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं.
BSF कॅम्पवर हल्ला
तीन ऑक्टोबर रोजी बीएसएफच्या कॅम्पवर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.