`एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी`; `फोटो सेशन` म्हणत हिणवणाऱ्या शाहांना टोला
Thackeray Group Slams BJP: विरोधीपक्षाच्या बैठकीचा तुलना ठाकरे गटाने रशियामध्ये बंड करणाऱ्या वॅगनर ग्रुपशी करताना या बैठकीचा उल्लेख पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ असा केला आहे.
Thackeray Group Slams BJP: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्र आलेल्या 17 पक्षांमुळे (Opposition Parties Meet) सत्ताधाऱ्यांना भीती वाटत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला आहे. तसेच विरोधी पक्षांची बैठक ही केवळ फोटो सेशनसाठी झाल्याची टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विधानाचा समाचार घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) टोला लगावण्यात आला आहे. तसेच रशियामधील व्लादिमीर पुतिन यांची राजवट ही हुकूमशाही पद्धतीची असल्याचं सांगताना त्या परिस्थितीची तुलना भारतामधील स्थितीशी करत विरोधी पक्षांच्या गटाला ठाकरे गटाने 'वॅनगर ग्रुप' असं म्हटलं आहे.
देशात ‘फोटोप्रेमी’ कोण? हे 140 कोटी जनता रोज पाहते
"पाटण्यात शुक्रवारी 17 प्रमुख राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक झाली. यात पाच विद्यमान मुख्यमंत्री तितकेच माजी मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपाचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले. लोकशाहीच्या दृष्टीने ही आनंदवार्ता आहे. या बैठकीवर गृहमंत्री अमित शहा यांनी अपेक्षित प्रतिक्रिया दिलीच आहे. अमित शहा म्हणाले, ‘‘विरोधक फोटोसाठी एकत्र जमले व कितीही विरोधक एकत्र आले तरी भाजपा 300च्या वर जागा जिंकेल हे नक्की.’’ श्री. शहा यांचे हे वरवरचे अवसान आहे. देशात ‘फोटोप्रेमी’ कोण? हे 140 कोटी जनता रोज पाहत आहे," असा टोला ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखातून लगावला आहे.
एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी
"फोटो किंवा प्रसिद्धीच्या आड येणाऱ्या आपल्याच नेत्यांना, मंत्र्यांना कसे ढकलून दूर केले जाते हे मोदी यांनी अनेकदा दाखवून दिले. भाजपाचे सर्व कार्यक्रम जनता किंवा देशासाठी नसून फोटोसाठीच असतात यात नव्याने सांगावे असे काय आहे? राहता राहिला प्रश्न 2024 ला काय निकाल लागेल याचा. या वेळचा निकाल ‘ईव्हीएम’ लावणार नाही, जनताच लावेल. ‘ईव्हीएम’चा घोटाळा झाल्याचा संशय आला तर मणिपूरसारखी परिस्थिती त्या वेळी देशात निर्माण होईल. इतका उद्रेक जनतेच्या मनात साचला आहे. विरोधक पाटण्यात फोटो काढण्यासाठी जमले हे मान्य केले तरी त्यांचा इतका धसका का घ्यावा? कालपर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘नड्डा’ वगैरे लोक ‘‘अब की बार भाजपा 400 पार’’ अशा गर्जना करीत होते. पाटण्याच्या फोटोसेशननंतर स्वतः अमित शहा म्हणतात, ‘‘आम्ही 300 जागा जिंकू.’’ म्हणजे विरोधकांच्या एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी केल्या व हीच विरोधकांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे," असंही या लेखात म्हटलं आहे.
भारत आणि रशियाची तुलना
"भारतीय जनता पक्ष हा हवेने भरलेला फुगा आहे. तो जरा जास्तच फुगवला आहे. सत्ता, मत्ता आणि प्रसिद्धी यामुळे लोकांत भ्रम निर्माण करता येतो, पण लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ सत्ता गाजवता येत नाही. मोदी, शहा यांनी विजयाचे ढोल वाजविण्यासाठी, मतदारांवर दबाव आणण्यासाठी भाडोत्री लोक मोठ्या प्रमाणात निर्माण केले. हे भाडोत्रीच त्यांच्यावर पहिला वार करतील. याचे प्रात्यक्षिक सध्या रशियात घडत आहे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी-शहादेखील देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही आणू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या. आपल्या आजूबाजूला भाडोत्री लोक उभे केले. त्या भाडोत्र्यांना देशाची संपत्ती विकली. आज पुतीन यांच्या देशात काय घडत आहे? पुतीन यांनी आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या ‘वॅगनर ग्रुप’ या खासगी लष्करानेच पुतीनविरुद्ध बंड पुकारले. पुतीन यांची हुकूमशाही राजवट उलथवून रशियात सत्तापालट करण्यासाठी पुतीन यांचेच हे खासगी लष्कर रस्त्यावर उतरले होते. मॉस्कोचा ताबा घेण्यासाठी हे लष्कर पुढे सरकले होते. रशियाने म्हणजे पुतीन यांनी युव्रेनवर निर्घृण हल्ले केले. एक देश बेचिराख केला. विजयाचा मद तेव्हा पुतीन यांना चढला. जागतिक युद्धाच्या घोषणा केल्या, पण स्वतःच्या खुर्चीखालीच बॉम्बची वात पेटली आहे याची भनक पुतीनसारख्या हुकूमशहाला लागली नाही," असं रशियामधील परिस्थितीचा संदर्भ भारताशी जोडताना ठाकरे गटाने म्हटलं आहे.
पुतीन यांना ही भाषा शोभत नाही
‘‘पुतीन यांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, अशी शपथ वॅगनर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी आधी घेतली होती. प्रिगोझिन यांनी जाहीर केले होते की, ‘‘पुतीन देश संपवायला निघाले आहेत. पुतीन यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे रशियात अराजक माजले आहे. आमच्याकडे हजारो लोकांची फौज आहे. आम्ही पुतीन यांना हटवणारच!’’ पुतीन हे स्वतःस बलाढ्य मानत होते. देशातील सर्व यंत्रणांचे मालकच बनून ते राज्य करीत होते. विरोधकांचा त्यांनी थेट काटाच काढला. सरळ ठार केले किंवा तुरुंगात डांबले. रशियाची जनता महागाई, बेरोजगारी, अंतर्गत कलह यामुळे मरणयातना भोगत असताना राष्ट्राध्यक्ष पुतीन हे युद्ध, मौजमजेत दंग होते व शेवटी त्यांचेच सैन्य त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. रशियातील निवडणुका हा गेल्या अनेक वर्षांत फक्त फार्स होता. पुतीन यांचे लोक गैरमार्गाचा वापर करून निवडून आले व त्यांनी संसदेत ताबा मिळविला. आता आपल्याला कुणाचेच भय नाही व परमेश्वराकडून अमृतच प्राप्त केल्याने अमर आहोत या गुंगीत असताना पुतीन यांच्या विरोधात बंड झाले पुतीन यांचे म्हणणे असे की, ‘‘वॅगनर संघटनेने पाठीत खंजीर खुपसला, देशद्रोह केला.’’ पुतीन यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो
"हुकूमशहा आपल्या सोयीप्रमाणे देशद्रोहाची व्याख्या करत असतो. भारतातही तेच सुरू आहे व लोकांच्या मनात क्रांतीची भावना रुजत आहे. भाजपाने सत्ता टिकविण्यासाठी अनेक बाजारबुणगे म्हणजे मिंधे आपल्याभोवती रक्षक म्हणून उभे केले. उद्या हेच लोक सगळ्यात आधी मोदी-शहांच्या पाठीत वार करून रस्त्यावर उतरतील. पुतीन यांच्या बाबतीत तेच घडले. अमेरिकेसह सर्व जगाने पुतीन यांना युद्ध करून युक्रेन बेचिराख करू नये असे आवाहन केले, पण मस्ती व धुंदीतल्या पुतीन यांनी ऐकले नाही. त्यामुळे जगात इतरही ‘चाणाक्ष’ लोक आहेत व तेही हुकूमशाहीच्या गडास सुरुंग लावू शकतात हे आता पुतीनविरोधी बंडामुळे दिसले. वॅगनर ग्रुपचे सशस्त्र सैन्य चिरडून टाकू असा आव पुतीन यांनी आणला, पण त्यांना ते जमले नाही. शेवटी मध्यस्थाकरवी वॅगनर ग्रुपच्या अध्यक्षांचे मन वळवून त्यास बेलारूस येथे पाठवले. म्हणजे वॅगनर ग्रुपपुढे माघार घेतली ती श्रीमान पुतीन यांनी. पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो," असं ठाकरे ग्रुपने म्हटलं आहे.
पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’
"पुतीन असो की मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो. हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘वॅगनर’ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे. मोदी बायडेन यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले. अत्यंत चुकीच्या इंग्रजीत भाषण करून त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले. हा अट्टाहास फक्त न्यूनगंड असलेली व्यक्तीच करू शकते. ‘व्हाईट हाऊस’च्या पत्रकार परिषदेत देशातील लोकशाही, संविधान, अल्पसंख्याकांवरील हल्ले यावर विचारलेल्या एकाच प्रश्नाने मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली हे स्पष्ट दिसते. त्यामुळे वॉशिंग्टनचे त्यांचे फोटोसेशन काळवंडून गेले. त्यात पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘वॅगनर ग्रुप’ एकत्र आला. हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे. पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ने तोच इशारा दिला," असं या लेखात विरोधकांच्या गटाला वॅगनर ग्रुपशी तुलना करताना उल्लेख करण्यात आला आहे.