नवी दिल्ली: चंद्रावर उतरलेल्या 'विक्रम'  लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न संपल्याचे इसरोने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. इसरोने एका ट्विटद्वारे चांद्रयान-२ मोहिमेला देशभरातून भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. याचा अर्थ विक्रम लँडरशी सर्व प्रकारे संपर्क साधण्याचे प्रयत्न करूनही संपर्क होत नाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे इसरोने आता विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न थांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, चांद्रयान २ चे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असून, पुढली सात वर्षं ऑर्बिटर चंद्राबद्दल विविध उपकरणांच्या माध्यमातून माहिती देत रहाणार आहे.


चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला असता. त्यामुळे भारत एका ऐतिहासिक यशाला मुकला होता. मात्र, यानंतर संपूर्ण देश इसरोच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला होता. 



विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होणे अपेक्षित होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जोरात आदळले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यानंतर चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. मात्र, विक्रम लँडर नक्की कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते.